रविवारी 173 नवे कोरोनाबाधित 180 कोरोनामुक्त बळीची संख्या 22 वर
प्रतिनिधी / पणजी
शतकपार आकडा कायम ठेवित काल रविवारी पुन्हा कोरोनाने 173 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण दिले. त्यामुळे सक्रिय कोरोना रूग्णांचा आकडा आता 1417 वर पोचला आहे. रविवारी 180 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी इंदिरानगर-चिंबल येथील एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोनाचा तो 22 बळी ठरला आहे.
कोरोनाचा फैलाव आता गोव्याच्या बऱयाच भागात झालेला आहे. गोवा ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब बनली आहे. कुठ्ठाळी आरोग्य केंद्रातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांचा आकडा 355 झाला आहे. वास्को भागातील कोरोना रुग्णांचा आकडा 294 झाला आहे. रस्ता वाहतूक, रेल्वे व हवाई वाहतुकीद्वारे आलेल्यांचा आकडा 140 वर पोचला आहे.
डिचोलीतील रूग्णसंख्या 10 झाली आहे. सांखळीतील रुग्णांचा आकडा 54 वर पोचला आहे. पेडणेतील रुग्णसंख्या 19, वाळपई 16, म्हापसा 40, पणजी 18, बेतकी 41, कांदोळी 28, कासारवणे 15, कोलवाळ 9 अशी रुग्णसंख्या आहे. चिंबलची रुग्णसंख्या 94 वर पोचली आहे. पर्वरीची रुग्णसंख्या 24 झाली आहे. कुडचडे 16, काणकोण 6, मडगाव 40, बाळ्ळी 8, कासावली 8, कुडतरी 11, लोटली 6, मडकई 13, केपे 14, शिरोडा 17, धारबांदोडा 28, फोंडा 45, नावेली 19 अशी कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.
………………………………………………………….
त्या प्रकरणाची चौकशी सुरु : आरोग्यमंत्री
गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात रुग्णांबाबत दुजाभाव केला जात नाही. वास्कोतील व्यक्तीला दुजाभावाची वागणूक मिळाल्याची तक्रार आणि जे काही घडले त्याबाबत चौकशी सुरु केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. आता डॉक्टरच कोरोनाबाधित होऊ लागल्याने थोडी चिंता वाढली आहे. वास्कोतील जनतेने चिंता करु नये. गोमेकॉत जे रुग्ण येतात त्यांची चाचणी आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना स्क्रीनिंग ओपीडीमध्ये पाठविले जाते. त्यानंतर त्याला कोठे पाठवायचे, याबाबत निर्णय होतो. खरोखरच वास्कोच्या व्यक्तीबाबत अशी घटना घडली असेल तर आपण माफी मागतो, असेही राणे म्हणाले.