ऑनलाईन टीम / पुणे :
जगभरात हाहाकार माजवणाऱया कोरोना विषाणूचा (कोविड-19) फोटो टिपण्यात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांना यश आले आहे.
एनआयव्हीच्या वैज्ञानिकांनी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक छायाचित्र तंत्राने हे फोटो घेतले आहेत. हे फोटो इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रीसर्च या नियतकालिकात प्रसिद्ध होणार आहेत. भारतात 30 जानेवारीला सापडलेल्या पहिल्या कोरोना रुग्णाच्या नमुन्याच्या आधारे हा फोटो घेण्यात आला आहे.
भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे माजी संचालक डॉ. निर्मल गांगुली याविषयी बोलताना म्हणाले, कोरोना विषाणूवर काटय़ांसारखी रचना असते. त्यामुळे त्यांना कोरोना म्हणतात. त्यावर शर्करा व प्रथिन संग्राहकांचा समावेश असतो. ते काटे पेशीत रुतले जातात व नंतर यजमान पेशीला चिकटून विषाणू शरीरात प्रवेश करतो.
पुण्याच्या एनआयव्ही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी रोगनिदान विभागाचे उपसंचालक डॉ. अतनु बसू म्हणाले, भारतातील कोविड 19 विषाणू हा चीनच्या वुहानमधील विषाणूशी 99.98 टक्के जुळणारा आहे. केरळातील मुलीच्या स्राव नमुन्यातील 500 मायक्रोलिटर भागातून हा विषाणू वेगळा काढण्यात आला. त्यानंतर त्याची चाचणी पॉलिमरेज अभिक्रियेने करण्यात आली. त्यातील द्रव भाग वेगळा काढून १ टक्के ग्लुटारेल्डीहाइडच्या मदतीने व नंतर कार्बन आवरण असलेल्या तांब्याच्या गाळणीतून गाळला गेला. त्यानंतर सोडियम फॉस्फोटय़ुनिस्टिक आम्लाचा वापर करून 100 केव्हीच्या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीच्या मदतीने कॅमेरा लावून त्याच्या प्रतिमा घेण्यात आल्या. हा विषाणू 70-80 नॅनोमीटरचा असून, त्यात 15 नॅनोमीटरचे कवच आहे.