अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनेही मानली हार
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
कोरोना विषाणूचा उगम कुठून झाला हे आम्हाला कधीच कळणार नसल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी म्हटले आहे. कोरोनाच्या उत्पत्तिचा शोध घेणाऱया अमेरिकेच्या यंत्रणांच्या हाती काहीच लागलेले नाही. कोरोना विषाणू प्राण्यांमधून माणसांमध्ये शिरल्याबाबत किंवा प्रयोगशाळेमधून विषाणूची गळती झाली का या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांकडून केला जात होता. तसेच यंत्रणांनी या महामारीमागे जैविक अस्त्र असल्याचा दावा फेटाळून लावला आहे.
ऑफिस ऑफ द युएस डायरेक्टर ऑन नॅशनल इंटेलिजेन्सकडून (ओडीएनआय) एक गोपनीय अहवाल सादर करण्यात आला आहे. सार्स-कोव्ह-2 कशाप्रमाणे माणसांमध्ये फैलावला, यावरून नैसर्गिक उत्पत्ति आणि प्रयोगशाळेत निर्माण होण्याच्या दोन्ही कल्पना लक्षवेधी आहेत. पण यातील कुठली शक्यता अधिक आहे हे सांगता येत नाही तसेच यावरून कुठलेही मूल्यांकन करता येत नसल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
कोरोना विषाणू जैविक अस्त्र असल्याची चुकीची माहिती फैलावण्यात आली आहे. जैविक अस्त्र असल्याचा दावा करणाऱयांचा ‘वुहान इन्स्टीटय़ूट ऑफ वायरोलॉजी’शी थेट संपर्क नसल्याचे अहवालात नमूद आहे. पण अहवालात स्वतःबद्दल फारसे नकारात्मक नसतानाही चीनने त्यावर टीका केली आहे. कोरोनासंबंधीच्या तपासात सहकार्य न केल्याप्रकरणी चीनला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठय़ा टीकेला सामोरे जावे लागले आहे. हा अहवाल अमेरिकेच्या अध्यक्षांना ऑगस्टमध्ये जारी केलेल्या 90 दिवसांच्या पुनरावलोकनाचा पुढील भाग आहे.
कोविड-19च्या उत्पत्तिचा शोध घेण्यासाठी वैज्ञानिकांऐवजी गुप्तचर यंत्रणांवर विश्वस ठेवण्याचा अमेरिकेचा निर्णय पूर्णपणे एक राजकीय तमाशा होता. हा प्रकार केवळ विज्ञानआधारित अध्ययनाला कमकुवत करेल आणि विषाणूच्या स्रोताला शोधण्याचे जगाकडून होत असलेल्या प्रयत्नांमध्ये अडचणी उभ्या करत असल्याचे वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाचे प्रवक्ते लियू पेंग्यू यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या अनेक समर्थकांनी कोविड-19 ला चिनी विषाणू ठरविले होते. तर माणसांमधील संक्रमणाचे पहिले प्रकरण प्रयोगशाळेत झालेल्या दुर्घटनेमुळे घडल्याची शक्यता अधिक असल्याचे चारपैकी एका यंत्रणेचे मानणे असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.