अमेरिकेत श्वेतवर्णीयांच्या तुलनेत कृष्णवर्णीय अन् हिस्पियन मुलांचा अधिक मृत्यू : सीडीसीच्या संशोधनात दावा
अमेरिकेत बिगरश्वेतवर्णीय आणि हिस्पियन मुलांना कोरोनामुळे मृत्युमुखी पडण्याचा अधिक धोका आहे. अमेरिकेतील सर्वात मोठी आरोग्य यंत्रणा सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार (सीडीसी) मृत्यूचा सर्वाधिक धोका अशा 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आहे. 12 फेब्रुवारी ते 31 जुलैपर्यंत कोरोनामुळे 21 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या 121 मुलांचा मृत्यू झाला. या 121 पैकी केवळ 17 जण श्वेतवर्णीय होते. तर 35 बिगरश्वेतवर्णीय आणि 54 हिस्पेनिक मुले होती. 47 प्रांतांच्या डाटावर संशोधन केल्यावर हा अहवाल प्रसारित करण्यात आला आहे.
वयोगटनिहाय मृत्यूप्रमाण
सीडीसीने कोरोनामुळे मुलांच्या होणाऱया मृत्यूच्या आकडेवारीला वयनिहाय मांडले आहे. यानुसार 1 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या मृत्यूचा आकडा 10 टक्के आहे. 1 ते 9 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये हा आकडा 20 टक्के आहे. याचबरोबर सर्वाधिक धोका 10 ते 20 वर्षांदरम्यान वय असलेल्यांना आहे.
प्रकरणे का वाढली?
पालक कामगार आहेत किंवा कोरोनाचा थेट सामना कराव्या लागणाऱया पेशाशी निगडित असलेल्या कुटुंबातील मुले मृत्युमुखी पडणाऱयांचे प्रमाण अधिक आहे. कमी जागा असलेल्या खोल्यांमध्ये राहणे, खाणे अन् राहण्याच्या योग्य सुविधेअभावी जोखीम अधिकच वाढली आहे. आर्थिक तंगीला तोंड देण्यासह ते शिक्षणाच्या कक्षेपासूनही दूर आहेत. याचमुळे श्वेतवर्णीयांच्या तुलनेत बिगरश्वेतवर्णीय आणि हिस्पॅनिक मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे सीडीसीने म्हटले आहे.
स्थुलत्व अन् अस्थमा
अमेरिकेत कोरोनामुळे जीव गमवाव्या लागलेल्या 75 टक्क्यांपेक्षा अधिक मुलांमध्ये किमान एक आजार राहिला आहे. यात स्थुलत्व, फुफ्फुसांशी निगडित आजार किंवा अस्थमा सर्वाधिक प्रमाणात दिसून आल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
इंग्लंडमध्येही अशीच स्थिती
काही महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये कोरोनासंबंधी शासकीय आकडेवारीत बिगरश्वेतवर्णीय आणि आशियाई वंशीय लोकांना सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले गेले होते. ब्रिटनमध्ये कोरोनाचा संसर्ग आणि बळी पडण्याचा सर्वाधिक धोका याच लोकांना असल्याचे नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसच्या रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. तेथे श्वेतवर्णीयांच्या तुलनेत बिगरश्वेतवर्णीयांमध्ये संसर्गानंतर मृत्युमुखी पडणाऱयांचा आकडा दुप्पट आहे. बिगरश्वेतवर्णीय, आशियाई आणि अल्पसंख्याकांना तेथे बेम म्हटले जाते, याचा अर्थ ब्लॅक, एशियन अँड मायनॉरिटी एथनिक असा होतो.
सरकारकडून चौकशी सुरू
आकडेवारी समोर आल्यावर सरकारने या असमानतेचे कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. एनएचएसच्या रुग्णालयांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 1 हजार लोकांमागे 23 ब्रिटिश, 27 आशियाई आणि 43 बिगरश्वेतवर्णीयांचा मृत्यू झाला आहे. एक हजार लोकांमागे 69 मृत्यूंसह सर्वाधिक धोका कॅरेबियन लोकांसाठी आहे. तर सर्वात कमी धोका बांगलादेशींना (22) आहे.
डिसेंबरमध्येच विषाणूचा शिरकाव
अमेरिकेत कोरोना विषाणूचा प्रभाव जानेवारी 2020 मध्येच सुरू झाला होता असे सीडीसीकडून सांगण्यात आले आहे. परंतु एक नवे संशोधन हा दावा फेटाळत आहे. युसीएलएनुसार कोरोना विषाणू जानेवारी 2020 नव्हे तर डिसेंबर 2019 मध्येच अमेरिकेत पोहोचला होता. हे संशोधन जर्नल ऑफ मेडिकल इंटरनेटवर प्रकाशित झाले आहे. 22 डिसेंबरपूर्वीच अमेरिकेच्या अनेक रुग्णालये आणि क्लीनिक्समधील रुग्णांची संख्या अचानकपणे वाढली होती. बहुतांश रुग्णांना श्वास घेताना त्रास होणे आणि अंगदुखीची समस्या झाली होती. अमेरिकेत पहिला रुग्ण अधिकृतपणे जानेवारीच्या मध्यास समोर आला होता. हा व्यक्ती चीनच्या वुहानमधून परतला होता.
तरुणांना धोका कमी
जगभरात आतापर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधितांमध्ये 20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या रुग्णांची संख्या 10 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. या वयोगटातील केवळ 0.2 टक्के रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. यासंबंधीची आकडेवारी जागतिक आरोगय संघटनेने प्रसारित केली आहे. परंतु यासंबंधी आणखीन अधिक संशोधन करण्याची गरज आहे. मुलांसाठीही हा विषाणू जीवघेणा असल्याचे आम्ही जाणतो, त्यांच्यातही सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. परंतु त्यांच्यात मृत्यूदर खूपच कमी असल्याचे डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आले आहे.
न्यूझीलंड : संसर्गावर नियंत्रण
न्यूझीलंडने पुन्हा एकदा कठोर उपाययोजनांच्या मदतीने संसर्गावर नियंत्रण मिळविले आहे. मंगळवारी सलग दुसऱया दिवशी देशात एकही नवा रुग्ण सापडला नाही. परंतु तरीही आरोग्य मंत्रालय विशेष खबरदारी बाळगून आहे. पहिल्या आणि दुसऱया टप्प्यात रुग्ण आढळलेल्या भागांमध्ये विशेष नजर ठेवली जात आहे. सरकारने आयसोलेशन आणि विलगीकरण सुविधाकेंद्रांना नव्याने दिशानिर्देश दिले आहेत. न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत 25 जण दगावले आहेत. देशात सोमवारपर्यंत निर्बंध कायम राहणार आहेत.
मुलांवर शैक्षणिक संकट
महामारीने मुलांना मोठय़ा प्रमाणात प्रभावित केले आहे. 192 देशांमध्ये निम्म्यापेक्षा अधिक मुले शाळेत जाऊ शकलेली नाहीत. महामारीने त्यांच्यावर गंभीर परिणाम केला आहे. सुमारे 16 कोटी शालेय मुले सध्या घरांमध्ये आहेत. दुर्गम भागात राहणारी लाखो मुले टीव्ही, इंटरनेट किंवा अशाचप्रकारच्या अन्य माध्यमातून शिक्षण मिळवत आहेत ही दिलासादायक बाब असल्याचे उद्गार युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरिटा फोरे यांनी काढले आहेत.
रशिया : स्वयंसेवकांना लस
रशियाच्या लसीच्या चाचणीनंतरच्या प्रक्रियेत 300 हून अधिक स्वयंसेवकांना स्पुतनिक-5 लस देण्यात आली आहे. यातील सुमारे 14 टक्के जणांनी थकवा, स्नायूंमध्ये वेदना किंवा शरीराचे तापमान वाढण्याची तक्रार केल्याची माहिती रशियाचे आरोग्यमंत्री मिखाइल मुराशको यांनी दिली आहे.
पुढील काही आठवडय़ांमध्ये लस मिळणार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
कोरोना संकट वाढत चालल्याने जगभराच्या नजरा लसप्रकल्पांवर केंद्रीत झाली आहे. याचदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनावरील लससंबंधी एक मोठा दावा केला आहे. सर्वकाही सुरळीत पार पडल्यस केवळ काही आठवडय़ांमध्ये कोरोनाची लस मिळू लागणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
घातक कोरोना विषाणूच्या विरोधातील एक लस 3 ते 4 आठवडय़ांवर असू शकते. तरीही काही आरोग्य अधिकाऱयांकडून खबरदारी बाळगण्यासह त्वरित कालमर्यादाही विचारात घेतली जात आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱया अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी एक लस वितरणासाठी तयार होऊ शकते असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
आम्ही एका लसीच्या अत्यंत नजीक आहोत. मागील प्रशासनाला एफडीएफ आणि मंजुरीपोटी लस उपलब्ध करण्यासाठी बहुधा अनेक वर्षे लागली असती, परंतु आम्ही लस काही आठवडय़ांमध्ये प्राप्त करू शकतो. लस मिळण्यास अद्याप 3 ते 4 आठवडे लागू शकतात असे ट्रम्प यांनी सांगितले आहे.
अमेरिकेचे प्रख्यात साथरोगतज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत लस तयार होणार असल्याचे मत व्यक्त केले होते. कदाचित ऑक्टोबर महिन्यातही एक लस उपलब्ध होऊ शकते असेही त्यांनी म्हटले आहे.