वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
सध्या जगभरातील विविध देशांमध्ये कोरोनाचा विषाणू पाय पसरत आहे. त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था चिंतेत पडली आहे. विविध देशातील आयात निर्यात आणि अन्य व्यापारांच्या उलाढाली पूर्णपणे ठप्प झाल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. वेगवेगळय़ा मार्गांचा उपयोग करत अनेक कंपन्या सुरु ठेवण्यासाठी धडपडत आहेत.
सध्या ओयो ही हॉटेल व्यवसायात कार्यरत असणारी ओयो कंपनी जागतिक पातळीवरील जवळपास 5 हजार कर्मचाऱयांना कमी करणार असल्याचे संकेत आहेत. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार सर्वाधिक कर्मचारी कपात ही चीनमध्ये होणार असून त्यानंतर अन्य देशांतील कर्मचाऱयांचा समावेश होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या कपातीनंतर ओयोच्या कर्मचाऱयांची संख्या घटून 25 हजार होणार आहे.
भारतीय स्टार्टअपमधून सुरु झालेल्या या व्यवसायात जपानची सॉफ्टबँक गुपची सर्वाधिक गुंतवणूक आहे. तर कंपनी आपला नफा वाढविण्यासाठी चीन, अमेरिका अणि आपली स्थानिक बाजारपेठ भारातील कर्मचाऱयांची संख्या घटविणार असल्याचे संकेत दिले आहे. जानेवारीपर्यंत जागतिक पातळीवर कंपनीमधील जवळपास 30 हजार कर्मचारी होते. त्यामधील 17 टक्क्यांपर्यंत कपात होण्याचे संकेत आहेत.