ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात आलेल्या दुसऱ्या कोरोनाच्या लाटेने गुरुवारी आता पर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. दुसऱ्या लाटेत कोरोना संकट हे अधिक गडद होताना दिसत आहे. कोरोनाची दररोज वाढणारी रुग्ण संख्या आणि मृत्यूच्या संख्येने भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. एका दिवसात मिळणाऱ्या संख्येने गुरुवारी 2 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील 24 तासात देशात 2 लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1038 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशात मगील 24 तासात 2 लाख 00 हजार 739 नवे रुग्ण आढळून आले. याबरोबरच देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 40 लाख 74 हजार 564 वर पोहोचली आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. पहिल्या लाटेत सर्वाधिक आकडा 97,249 इतका होता.
- सलग दुसऱ्या दिवशी 1 हजार पेक्षा अधिक मृत्यू
गुरुवारी आता पर्यंतच्या सर्वाधिक म्हणजेच 1,038 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 1 लाख 73 हजार 123 एवढी झाली आहे. हा मागील 6 महिन्यातील सर्वाधिक आकडा आहे. यापूर्वी 17 ऑक्टोबर रोजी 1,032 जणांचा मृत्यू झाला होता. सद्य स्थितीत कोरोना मृत्यूचे प्रमाण 1.25 % इतके आहे.
- 14 लाख 71 हजार 877 रुग्णांवर उपचार सुरु
काल देशात 93,528 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 1 कोटी 24 लाख 29 हजार 564 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 11 कोटी 44 लाख 93 हजार 238 जणांना लस देण्यात आली आहे. सध्या देशात 14 लाख 71 हजार 877 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत देशात 26 कोटी 20 लाख 03 हजार 415 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 13 लाख 84 हजार 549 कोरोना चाचण्या बुधवारी (दि. 14 एप्रिल 2021) एका दिवसात करण्यात आल्या.