- 32.68 लाखांपेक्षा अधिक ॲक्टिव्ह रुग्ण
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे. दररोज वाढत असलेली रुग्ण वाढ आणि मृतांची संख्येने दहशत निर्माण केली आहे. त्यात काल भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा विस्फोट झालेला झाला आहे. या वर्षात पहिल्यांदाच एका दिवसात रुग्णांनी 4 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील 24 तासात देशात 4 लाख 01 हजार 993 नवे रुग्ण आढळून आले. तर 3,523 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात दुसऱ्या लाटेत कोरोना संकट हे अधिक गडद होताना दिसत आहे. बुधवारी देशात 2 लाख 99 हजार 988 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 वर पोहचली असून, मृतांची संख्या 2 लाख 11 हजार 853 एवढी आहे. तर आतापर्यंत 15 कोटी 49 लाख 89 हजार 635 जणांना लस देण्यात आली आहे. वाढती मृत्यू संख्या ही भीतीदायक आहे.
सध्या देशात 32 लाख 68 हजार 710 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 कोटी 56 लाख 84 हजार 406 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.99 % आहे. तर मृत्यू दर 1.11% इतका आहे.
आतापर्यंत देशात 28 कोटी 83 लाख 37 हजार 385 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 19 लाख 45 हजार 299 कोरोना चाचण्या बुधवारी (दि. 30 एप्रिल 2021) एका दिवसात करण्यात आल्या.
- एप्रिल महिन्यात 66 लाखांपेक्षा अधिक रुग्ण
भारतापूर्वी केवळ अमेरिकेतच एका दिवसात 4 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले होते. तर एप्रिल महिन्यात भारतात तब्बल 66 लाख पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. 5 एप्रिल पासून प्रत्येक दिवशी 1 लाख पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. तर 15 एप्रिलला ही संख्या प्रतिदिन 2 लाखांवर पोहचली तर 22 एप्रिल पासून प्रतिदिन 3 लाख पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत.