- तीन आठवड्यांसाठी शाळा राहणार बंद
ऑनलाईन टीम / पॅरिस :
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. फ्रान्समध्ये तर कोरोनाची तिसरी लाट आली असून सरकारला देशव्यापी लॉकडाऊन लावण्यासाठी मजबूर करण्यात आले आहे.
फ्रान्समध्ये कोरोनाने रौद्ररुप धारण केल्याने भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राॅन यांनी तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. ते म्हणाले, संपूर्ण देशात चार आठवड्यांचा लॉकडाऊन असणार आहे. तसेच फ्रान्समधील शाळा तीन आठवड्यांसाठी बंद असणार आहेत असे ही त्यांनी यावेळी नमूद केले.
तसेच जर आपण आता हालचाल केली नाही तर नियंत्रण गमावून बसू, अशी भीती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी देशवासियांना संबोधित करताना व्यक्त केली. पुढे ते म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवली जातील. यासोबतच नागरिकांना ऑफिसमध्ये न जाता घरून काम करण्यास सांगितले आहे. 10 किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या फ्रान्समध्ये कोरोना रुग्णांनी 46.46 लाखांचा आकडा पार केला असून आतापर्यंत 95,502 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत 5000 रुग्ण आयसीयूमध्ये आहेत.