मनपा आयुक्त जगदीश के.एच. यांनी कर्मचाऱयांची घेतली बैठक : विनामास्क फिरणाऱयांवर कारवाईसाठी 7 पथकांची नियुक्ती
प्रतिनिधी / बेळगाव
बेंगळूर शहरात रुग्णांची संख्या वाढली असल्याने शहरात धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीचे सत्र संपताच आता कोरोना नियंत्रणासाठी सज्ज राहण्याचा आदेश महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱयांना दिला. विनामास्क कारवाई, सॅनिटायझर फवारणी, सामाजिक अंतर राखणे आदी जबाबदाऱया काटेकोरपणे राबविण्याच्या सूचना केल्या.
देशभरात कोरोना विषाणूंचा हाहाकार माजला असून मागील दोन दिवसात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी सोमवारी महापालिका कार्यालयात स्वच्छता विभागाच्या अधिकाऱयांची व कर्मचाऱयांची बैठक घेतली. यावेळी खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यासाठी आवश्यक पावले उचलणे गरजेचे असल्याचे सांगितले. देशात कोरोनाचे संकट वाढले असून बेंगळूर शहरात दिवसभरात दहा ते पंधरा हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. आठ दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागातील स्वच्छता कर्मचाऱयांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. पण ज्यांनी लस घेतली नाही त्या कर्मचाऱयांनी लस घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. आपले कर्तव्य बजावत असताना आपला जीव सांभाळणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घेत कर्तव्य बजावावे, अशी सूचना महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी केली.
सध्या पोटनिवडणूक झाली असल्याने ठिकठिकाणी सभा, बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी सामाजिक अंतर राखण्यात आले नसल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे महापालिकेने आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोना विषाणूंचा प्रसार होऊ नये याकरिता आरोग्य खाते आणि शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करण्यासाठी काटेकोरपणे कारवाई करण्याची सूचना आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी केली. विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करण्यासाठी सात पथकांची नियुक्ती करण्यात आली असून सदर पथकांनी ही कारवाई बाजारपेठेत सातत्याने करावी. बाजारपेठेत जनजागृती करून सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन करण्याची सूचना केली. आवश्यक ठिकाणी सॅनिटायझर करणे, सामाजिक अंतर राखणे, स्वच्छतेचे काम व्यवस्थित करण्याची सूचना करून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सज्ज राहण्याचा आदेश मनपा आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांना बजावला आहे.