अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन यांचा गुप्तचर यंत्रणांना आदेश
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
येत्या 90 दिवसात कोरोना विषाणू कुठून आला याचा शोध लावा, असे आदेश अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी गुप्तचर यंत्रणांना दिले आहेत. अमेरिकन प्रयोगशाळांनी आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी यासंदर्भात गुप्तचर यंत्रणांना मदत करावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आतापर्यंत संशयाच्या गर्तेत असलेल्या चीनलाही सहकार्य करण्यास बजावले आहे.
कोरोना विषाणूचे जन्मस्थळ शोधण्यासाठीचे प्रयत्न वाढवण्याचे निर्देश अमेरिकन अध्यक्षांनी गुप्तचर यंत्रणांना दिल्यामुळे आता चीनची कोंडी होऊ शकते. प्राण्यांच्या माध्यमातून कोरोनाचे माणसात संक्रमण झाले की चीनमधील प्रयोगशाळेतून अपघाताने या विषाणूची साथ पसरली याचा परत सखोल तपास घेतला जावा अशा सूचना देतानाच बायडेन यांनी चीनने या आंतरराष्ट्रीय तपासात सहकार्य करावे असे अपील केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड विषाणू चीनच्या प्रयोगशाळेतून लिक झाला नसल्याचा खुलासा यापूर्वी केला होता. मात्र, ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या गुप्तचर अहवालात हा विषाणू जगात पसरण्याच्या आधी वुहान प्रयोगशाळेत काम करणारे तीन चिनी संशोधक आजारी पडले होते, असा दावा करण्यात आला आहे.
‘डब्ल्यूएचओ’च्या अहवालाबाबत संशय
जागतिक आरोग्य संघटनेचे निष्कर्ष पुन्हा तपासून पाहिले गेले पाहिजेत असे बायडेन यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने चीन प्रयोगशाळेला भेट देऊन गोळा केलेल्या माहितीमध्ये प्राण्यांच्या तपासणी डेटाकडे दुर्लक्ष केले होते असे म्हटले जात आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने 200 पानी अहवाल सादर केला आहे. मात्र त्यात अनेक त्रुटी असल्याचे म्हटले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेची कोरोना जन्मस्थान संशोधनाच्या संदर्भातील पुढची बैठक येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे.
‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या अहवालाची खातरजमा होणार
जगभर धुमाकूळ घालणारा कोरोना विषाणू हा मानवनिर्मिती नसून नैसर्गिक आहे, अशी समजूत करून देण्याचा प्रयत्न मध्यंतरीच्या काळात केला गेला आहे. तथापि, यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या तज्ञांच्या नव्या अहवालात हा विषाणू मानवनिर्मित असून त्याची निर्मिती चीनच्या वुहान शहरातील प्रयोगशाळेत करण्यात आली आहे, ही बाब स्पष्ट झाल्यामुळे चीनची कोंडी होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नल या नियतकालिकात हा अहवाल प्रसिद्ध झाला असून त्याची खातरजमा आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध गुप्तचर यंत्रणा आणि शास्त्रज्ञांकडून होऊ शकते. साहजिकच यातील तपासाची दिशा चीनकडेच राहणार हेही उघड झाले.
चीनकडून इन्कार, अमेरिकेचा दबाव
चीनकडून आरोपांचा इन्कार करण्यात आला होता. कोरोना विषाणू नैसर्गिक असून वटवाघळांमध्ये त्याचे उगमस्थान आहे. तेथून तो मानवाच्या शरीरात पसरला असा चीनचा दावा आहे. तथापि, अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने चीनवर दबाव आणण्यास प्रारंभ केला आहे. कोरोना विषाणूची निर्मिती कशी झाली या प्रश्नाच्या संशोधनात चीनला पूर्ण सहकार्य करावे लागेल, असा इशारा देत आता गुप्तचर यंत्रणांना 90 दिवसात शोध घेण्याचा आदेश दिला आहे.