नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशातील २६ राज्यांमधील १११ ट्रेनिंग सेंटरमध्ये कोविड-१९ हेल्थकेअर फ्रंटलाइन वर्कर्ससाठी ‘कस्टमाइज्ड क्रॅश कोर्स प्रोग्राम’ कोर्स तयार करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज शुभारंभ केला. यावेळी त्यांनी देशातील कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी एक लाख कोरोना योद्धा निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, आजपासून देशात एक लाख फ्रंट लाईन वर्कर्स तयार करण्याचं महाअभियान सुरू होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हायरसचं बदलतं स्वरुप पाहिलं. त्यामुळे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एक लाख कोविड योद्धे निर्माण केले जात आहे. त्यासाठी सहा नवे कोर्स करण्यात आले असून एक लाख तरुणांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा कोर्स दोन ते तीन महिन्यात पूर्ण होणार आहे.या प्रशिक्षणांतर्गत मोफत ट्रेनिंग देण्यात येणार आहे. प्रशिक्षित योद्ध्यांचा दोन लाखांचा विमाही काढण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोविड -१९ फ्रंटलाइन कामगारांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात केली. २६ राज्यांमधील १११ प्रशिक्षण केंद्रांमध्ये हा क्रॅश कोर्स प्रोग्राम सुरु करण्यात आला आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री महेंद्र नाथ पांडे यावेळी उपस्थित होते.