ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोनाची स्थिती हळूहळू सुधारत आहे. त्यातच तिसरी लाटेच्या धोक्याबाबत भीती व्यक्त केली जात आहे. मात्र तिसरी लाट कधी येणार? याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रॉस अदहानोम गेब्रेयेसस महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोनाची तिसरी लाट सुरुवातीच्या टप्प्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुखांनी जगभरातील कोरोना संक्रमण आणि मृत्यूची संख्या पुन्हा वाढली असून कोरोनाची तिसरी लाट सुरुवातीच्या टप्प्यात असल्याचे म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, दुर्दैवाने आपण आता तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत. डेल्टा वेरिएंट आता 111 हून अधिक देशांमध्ये पोहोचला आहे. कोरोनाचा विषाणू सतत आपले स्वरुप बदलत आहे, परिणामी आणखी संसर्गजन्य वेरिएंट उदयास येत आहेत.
संघटनेचे प्रमुख म्हणाले की, उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये लसीकरणाच्या वेगवान गतीमुळे संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये आणि मृत्यूंमध्ये घट झाली होती, पण तेथील बाधितांची संख्या आता पुन्हा वाढू लागली आहे. जगभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. ते म्हणाले की, गेल्या आठवड्यात सलग चौथ्या आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घट झाली होती. पण आता कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तसेच दहा आठवड्यांनंतर कोरोना मृत्यूंमध्येही पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणे आणि लसीकरणाची गती वाढवण्यावर भर देण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.