ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
दिल्ली प्रमाणेच अहमदाबादमध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 20 ते 23 नोव्हेंबर दरम्यान, अहमदाबादमध्ये रोज रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे. या काळात केवळ दूध आणि मेडिकलची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या सोबतच राज्य सरकारने 23 नोव्हेंबरपासून शाळा – कॉलेज सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना अतिरिक्त मुख्य सचिव राजीव कुमार गुप्ता यांनी सांगितले की, गुजरातमधील अहमदाबाद शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शुक्रवारपासून निगम सीमा अंतर्गत 57 तासांचा कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या काळात दूध सेवा आणि मेडिकल सेवाच सुरू राहील.
दरम्यान, गुजरातमध्ये मागील 24 तासात 1,340 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर राज्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाख 92 हजार 982 वर पोहोचला आहे. आता पर्यंत 1,76,475 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 3,830 जणांचा मृत्यू झाला आहे.