ऑनलाईन टीम / चंदीगड :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत देशातील अनेक राज्यात विकेंड कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. त्यातच आता चंदीगड प्रशासनाने देखील पुन्हा एकदा विकेंड कर्फ्यूची घोषणा केली आहे.
या विकेंड कर्फ्यू सुरुवात शनिवारी सकाळी 5 वाजल्यापासून होणार असून सोमवारी 31 मे च्या सकाळी 5 वाजेपर्यंत चालू राहील. या दरम्यान नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई असेल. पण सकाळी 6 ते 9 याकाळात नागरिकांना वॉक घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच केवळ आवश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 2 वाजे पर्यंत होम डिलिव्हरीसाठी सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, सद्य स्थितीत चंदीगडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मात्र ज्यादा सूट दिल्यास रुग्ण संख्या वाढू शकते त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा विकेंड कर्फ्यू जारी केला आहे. यापूर्वीच्या आठवड्यात शनिवार रविवार सोडून अन्य दिवशी प्रशासनाने थोडी सूट दिली होती.
शनिवार आणि रविवार सोडून अन्य दिवशी सूट दिल्याने आवाजाही वाढत आहे. अन्य दिवशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, नाईट कर्फ्यू सर्व ठिकाणी व्यवस्थितरित्या चालू ठेवण्यात आला आहे. नाईट कर्फ्यूची वेळ रात्री 10 ते सकाळी 5 असून या कालावधीत सर्व सेवा पूर्णपणे बंद असतील.
दरम्यान, नागरिकांना सूट कालावधीत बाहेर पडताना देखील चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्राइवेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच सर्व शॉपिंग मॉल, थिएटर, स्पा, सलून, गार्डन अजूनही बंदच ठेवण्यात आले आहेत. तसेच रेस्टॉरंटमध्ये बसून खाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.