बेळगाव :/ प्रतिनिधी
संपूर्ण जगाने कोरोना व्हायरसचा धसका घेतला असताना आता भारतातही मोठय़ा प्रमाणात धास्ती निर्माण झाली आहे. शहराच्या जनजीवनावर याचा मोठा परिणाम झाला असून शनिवारी बाजारपेठेसह मॉल, चित्रपटगृहे, वाहतूक क्यवस्था यांनाही ग्राहकांचा थंडा प्रतिसाद मिळाला. बाजारपेठेतील व्यवहार मंदावल्याचे दिसून आले तर काही ठिकाणी शुकशुकाट पसरला होता.
टिळकवाडीतील काही मोठय़ा शोरुम्स सुरूच, ग्राहकांचा थंडा प्रतिसाद
बंदीचा आदेश असूनही टिळकवाडीतील काही मोठी शोरुम्स, मॉल सुरू होते. मात्र धास्तीने ग्राहकांचा याला थंडा प्रतिसाद मिळाला. शहरातील चित्रपटगृहेदेखील याला अपवाद नसून कोरोनाच्या धास्तीने शहरातील चित्रपटगृहांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविली. या पार्श्वभूमीवर सावधगिरी म्हणून लोक एकत्रित येणाऱया ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे.
मल्टिप्लेक्समध्ये शुकशुकाट
जगभरात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून येत असून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारच्या बाजारादिवशीही मल्टिप्लेक्समध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. प्रशासनाने मॉल, पब, यात्रा आदींवर बंदी घातली आहे. वर्दळीच्या ठिकाणी खबरदारीचा इशारा म्हणून मास्क वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी जागृतीपर फलक लावून जनजागृती करण्यात येत आहे.