गुहागर तालुका भाजपचे तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी/ गुहागर
कोविड 19ची माहिती प्राथमिक आरोग्य उपकेंद्रनिहाय प्रसिद्ध करुन तहसील व पंचायत समिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात यावी आणि याची माहिती ग्रामकृती दलांना देण्यात यावी, अशी मागणी गुहागर तालुका भाजपने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोरोना संसर्ग वाढीच्या दृष्टीने सर्वसामान्य रुग्णांकरिता तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये प्रशासनाने किती ऑक्सिजन बेड उपलब्ध केलेले आहेत, किती व्हेंटीलेटर बेड उपलब्ध आहेत, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटर सुविधा उपलब्ध आहे का, याची सर्व माहिती सर्वसामान्य नागरिकांकरिता प्रसिद्ध करण्यात यावी व गावातील ग्राम कृतीदलांना याविषयी सविस्तर कळवण्यात यावे. गुहागर तालुक्यामध्ये प्रशासनाने कोणत्या ठिकाणी कोविड सेंटर उभारले आहे, त्या कोविड सेंटरमध्ये किती रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे, याची माहिती प्रसिद्ध होणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र सरकारने कोरोना रुग्णांकरिता दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सर्व औषधे व इंजेक्शन यांची उपलब्धता ग्रामीण रुग्णालय, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र यामध्ये कितीप्रमाणात आहे, यासह प्रतिदिनी कोरोनाचे निर्माण होणारे रुग्ण, बरे होणारे रुग्ण, कोरोनामुळे होणारे मृत्यू याची माहिती गावातील ग्राम कृती दल व ग्रामपंचायतींना आरोग्य उपकेंद्र कार्यक्षेत्रानुसार देण्यात येऊन ती माहिती प्रतिदिनी तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालय यांच्या नोटीस बोर्डवर नियमितपणे अद्ययावत आकडेवारीसह प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.