प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने आवश्यक चाचण्या करुन त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. ते कोरोना काळात विविध ठिकाणी भेटी देवून समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत होते. सर्वसामान्य जनतेला अन्नधान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.
कोरोना झालेल्यांना उपचार मिळावेत यासाठी अनेकवेळा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांशी चर्चा देखील केली. असे करत असतानाच त्यांना कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. नुकताच त्यांचा वाढदिवसही होता. मात्र त्यांनी कोणाशीच संपर्क साधला नाही. शुक्रवार दि. 10 पासून त्यांची तब्बेत बिघडली होती. ताप व इतर लक्षणे आढळून आल्याने शनिवारवारपासून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
रविवारी रात्री स्वॅब तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मला त्रास होत असल्यामुळे मी कोणाच्याच संपर्कात आलो नाही, असे त्यांनी सांगितले. सोमवारी जन्मदिनीही कार्यकर्त्यांपासून दूर राहिल्याचे त्यांनी सांगितले आहे.