रियाद
येत्या 12 एप्रिलपासून सुरु होणाऱया रमजान महिन्यामध्ये कोरोना विषाणू प्रतिबंधक लस घेण्यासंबंधी महत्त्वाची घोषणा सौदी अरबच्या सर्वात मोठय़ा मुफ्तीने केली आहे. मुफ्ती शेख अब्दुला अजीज अल शेख यांनी म्हटले आहे, की रमजानच्या दरम्यान कोरोना विषाणूची लस घेतल्यास रोजा मोडला जाणार नाही. त्यामुळे रोजाच्या काळात मुस्लिम बांधवांनी लस टोचून घ्यायला हरकत नाही, असेही मुफ्तींनी सुचवले आहे. मुफ्ती यांनी केलेल्या या घोषणेमुळे कोटय़वधी मुस्लिमांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे म्हटले जात आहे. रमजानच्या दरम्यान रोजा ठेवला जातो आणि याच वेळी जर कोरोना लस घेतली तर रोजाचे काय होणार व यासाठी अन्य पर्याय काय यासह अन्य प्रश्नांचा गोंधळ निर्माण होत होता. सदरच्या शंकांवर स्पष्टीकरण देताना मुफ्ती शेख अब्दुल यांनी म्हटले आहे, की कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यास कोणाचाही रोजा मोडला जाणार नसल्याचे म्हटले आहे.