एकूण 52 लाख 15 हजार रुपये वितरित
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यामधील अनेक जिल्हय़ांतील वकिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्या वकिलांना कर्नाटक राज्य बार असोसिएशनतर्फे नुकसानभरपाई देण्यात येत आहे. दि. 27 मे रोजी झालेल्या बैठकीत एकूण 343 वकिलांचे अर्ज निकालात काढण्यात आले असून एकूण 52 लाख 15 हजार रुपये त्यांना वितरित करण्यात आले आहेत.
कोरोना झालेल्या वकिलांना हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यास 25 हजार रुपये तर घरामध्ये उपचार घेतल्यास 10 हजार रुपये देण्यात येत आहेत. राज्यातून एकूण 343 वकिलांनी अर्ज केले होते. ते अर्ज नुकत्याच झालेल्या बैठकीत निकालात काढण्यात आले आहेत.
हॉस्पिटलमध्ये 119 जणांनी उपचार घेतले. त्यांना 25 हजार रुपयांप्रमाणे रक्कम देण्यात आली तर 224 वकिलांनी घरी राहूनच उपचार घेतले आहेत. त्यांना दहा हजार रुपयांप्रमाणे रक्कम दिली आहे. अशी एकूण 52 लाख 15 हजार रुपये रक्कम वितरित करण्यात येणार आहे.
येत्या तीन ते चार दिवसांत त्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे सदस्य आणि बेळगाव बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विनय मांगलेकर यांनी कळविले आहे.