जगासमोर आजही समस्या बनून उभ्या ठाकलेल्या कोरोना या विषाणूचे अनेक साईड इफेक्टस् आतापर्यंत ज्ञात झालेले आहेत. त्यात वास आणि चव घेण्याची क्षमता नाहीशी होणे, हृदय व इतर अवयवांवर विपरीत परिणाम होते. डोकेदुखीची समस्या, झोप न येणे इत्यादींचा समावेश आहे. तथापि जसजसे यावर अधिक संशोधन होत आहे तसे त्याचे आणखी साईड इफेक्टस् समजत आहेत.
गेल्या काही दिवसांत आणखी दोन विचित्र साईड इफेक्टस् समोर आले आहेत. त्यानुसार कोरोना झालेल्या व्यक्तीला तांद्यातून कुजलेल्या अंडय़ाचा वास येणे आणि दुधातून दुर्गंधीयुक्त वासाची जाणीव होणे हे दोन नवे साईड इफेक्टस् समजून आले आहेत. त्यामुळे संशोधकही कोडय़ात पडले आहेत. कोरोनामधून बऱया झालेल्या लोकांपैकी साधारणतः 20 टक्के लोकांमध्ये वेगवेगळय़ा प्रकारचे साईड इफेक्टस् दिसून आले आहेत. त्यापैकी काही जणांमध्ये हे दोन विचित्र साईड इफेक्टस् पाहावयास मिळत आहेत. या साईड इफेक्टस्वर मात करण्यासाठी स्मेल रिट्रेनिंग उपचार पद्धतीचा उपयोग केला जातो. तथापि ती सर्वत्र उपलब्ध नाही, अशी समस्या आहे. ही उपचार पद्धती प्रभावी असून सहा आठवडय़ापर्यंत घ्यावी लागते. या उपचार पद्धतीत रुग्णाला काही विशिष्ट वस्तू हुंगण्यासाठी दिल्या जातात. त्यातून त्याची वास घेण्याची क्षमता पुन्हा प्रस्थापित होऊ शकते.