कोरोना केवळ झाले निमित्त : कॅन्सर, मधुमेही रुग्ण अधिक : काही बळी संसर्गाकडील दुर्लक्षामुळे
महेश कोनेकर / मडगाव
कोणत्याही आजाराची पार्श्वभूमी नसल्यास कोविडवर मात करणे शक्य आहे. 70-80 वर्षाचे रूग्ण देखील कोरोनातून मुक्त झालेले आहेत. पण, ज्यांना आजाराची पार्श्वभूमी आहे, त्यांना कोरोनातून बाहेर पडणे अशक्यप्राय बनले आहे. गोव्यात कालपर्यंत एकूण 17 जणांचे बळी गेले. त्यातील किमान 14 जणांना कोणता ना कोणता आजार होता. त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग पेलणे कठीण गेले. अपवाद फक्त दोन रूग्ण ठरले आहेत. त्यांना अन्य कोणताही आजार नव्हता. मात्र त्यांनी कोरोनाच्या संसर्गाकडे दुर्लक्ष केले होते.
सोमवार दि. 22 जून रोजी गोव्यात कोरोनाचा पहिला बळी गेला. मोर्ले-सत्तरी येथील 85 वर्षीय वृद्धाने पहाटे 5.45 वाजता अखेरचा श्वास घेतला. या वृद्धाला अस्थमा व मधुमेहाचा आजार होता. गेली चार वर्षे अंथरूणावरच होता. याच दिवशी रात्री 11च्या दरम्यान खारीवाडा-वास्को येथील 60 वर्षीय रूग्णांचा बळी गेला होता. या व्यक्तीला सुद्धा हृदयविकाराचा आजार होता.
फातोर्डा, ताळगावातील रुग्णांनाही अन्य आजार
शनिवार दि. 27 जून रोजी कोविडमुळे तिसरा बळी गेला. तो चंद्रावाडा-फातोर्डा येथील एका महिलेचा होता. ही महिला 76 वर्षीय होती. तिच्यावर मडगावच्या खाजगी हॉस्पिटलात उपचार सुरू होते. त्यावेळी तिची कोरोना चाचणी घेतली असता ती पॉझिटिव्ह आढळून आली होती. नंतर तिला कोविड हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. या महिलेलासुद्धा अन्य आजार होते. त्यात कोरोनाची बाधा झाल्याने ती सावरू शकली नाही. मंगळवार दि. 30 जून रोजी कोरोनाचा चौथा बळी गेला तो ताळगांव येथील 66 वर्षीय व्यक्तीचा. या व्यक्तीला देखील अन्य आजार होते.
वास्कोतील मच्छीमाराचा मृत्यू दुर्लक्षामुळे
शुक्रवार दि. 3 जुलै रोजी रात्री 11.30च्या दरम्यान पावलिना फर्नांडिस या 75 वर्षीय महिलेचा बळी गेला. तो पाचवा बळी होता. ही महिला कुडतरी येथील होती. तिला फुफ्फुसांचा आजार होता. कोविडच्या संसर्गमुळे तिची प्रकृती खालावली व तिचा बळी गेला. सुमारे दोन आठवडे तिच्यावर कोविड हॉस्पिटलात उपचार सुरू होते. याच दिवशी खारीवाडा-वास्को येथे राहत्या घरात एका 45 वर्षीय मच्छीमाराला मृत्यू आला होता. दहा दिवस त्याला ताप येत होता व तो घरातच होता. त्याची स्वॅब चाचणी घेण्यात आली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला होता. हा कोविडचा सहावा बळी ठरला होता. या मच्छीमाराला अन्य आजार नव्हता. परंतु, कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करून घरी राहिल्याने त्याचा बळी गेला होता.
नगरसेवक पास्कॉल यांना आजाराची पार्श्वभूमी
रविवार दि. 5 जुलै रोजी वास्को पालिकेचे नगरसेवक पास्कॉल डिसोजा (72) यांच्या रूपाने कोविडचा सातवा बळी ठरला. पास्कॉल डिसोजा हे माजी महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोजा यांचे बंधू होते. पास्कॉल यांनाही आजाराची पार्श्वभूमी होती. दोन वर्षापूर्वी ते गंभीर आजारातून सावरले होते. जेव्हा कोरोनाचा संसर्ग झाला, तेव्हा ते असिम्प्टोमॅटिक होते. त्यामुळे त्यांना कोविड हॉस्पिटलमध्ये भरती करून घेण्याची तयारी नव्हती. पण, त्यांना आजाराची पार्श्वभूमी असल्याने त्यांना कोविड हॉस्पिटलात दाखल करून घेतले होते. या ठिकाणी अवघ्या दोन-तीन दिवसात ते सिम्प्टोमॅटिक बनले. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले होते.
डॉ. आमोणकरांना होता मूत्रपिंडाचा आजार
सोमवार दि. 6 रोजी माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश आमोणकर (68) यांचा बळी गेला. हा गोव्यातील आठवा बळी होता. डॉ. आमोणकर यांना मूत्रपिंडाचा तीव्र आजार होता व ते डायलिसिस घेत होते. कोविड हॉस्पिटलमध्येही त्यांना एकदा डायलिसिस देण्यात आले होते. त्यांनी तब्बल चौदा दिवस कोविडशी झुंज दिली होती.
संसर्गाकडे दुर्लक्ष केल्याने महमद शेखचा बळी
गुरूवार दि. 9 जुलै रोजी वास्कोतील महम्मद हनिफ शेख (50) याला कोविडमुळे मृत्यू आला. हा कोविडचा 9 बळी होता. महम्मद हनिफ शेख याला ताप येत असल्याने चिखली आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेथून त्याला गोमेकॉत हलविण्यात आले व गोमेकॉत त्याने अखरेचा श्वास घेतला. महम्मदला अन्य कोणता आजार नव्हता. कोरोनाच्या संसर्गाकडे दुर्लक्ष केल्याने त्याला मृत्यू आला.
मधुमेह, वृद्धत्व, यकृताच्या आजारामुळेही गेले बळी
शनिवार दि. 11 जुलै रोजी एकाच दिवशी तिघांचा बळी गेला. या दिवशी पहाटे 3 वाजता रूमडावाडा-हेडलँडसडा, वास्को येथील श्रीमती मंगला मयेकर (80) हिचा कोविडमुळे बळी गेला. तिला मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाचा आजार होता. त्यानंतर सकाळी 10.30 वा. सासमोळे-बायणा येथील शफी हुसेन (31) या युवकाचा कोविडमुळे बळी गेला. दारूचे व्यसनामुळे यकृताचा आजार होता तसेच त्याला काविळ झाली होती. संध्याकाळी 3.30 च्या दरम्यान बायणा वास्को येथील अमीर बेग (80) यांचा बळी गेला. ही व्यक्ती वयोवृद्ध असल्याने कोविडचा आजार पेलणे तिला शक्य झाले नाही. या तिघांच्या मृत्यूमुळे एकूण संख्या बारावर पोचली होती.
पाळोळेच्या रुग्णालाही होता कॅन्सर
रविवार दि. 12 जुलै रोजी दोन बळी गेले होते. त्यात सकाळी 7.30च्या दरम्यान पाळोळे-काणकोण येथील सांतान डायस (49) याला मृत्यू आला. त्याला कॅन्सरचा आजार होता व तो मणिपाल इस्पितळात उपचार घेत होता. तेथेच त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याने कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दुपारी 2.30च्या दरम्यान चिखली-वास्को येथील श्रीमती सुशिलाबाई चिपळूणकर (81) हिचा कोरोनामुळे बळी गेला. तिला ही शारीरिक आजार होता. या दोघांच्या मृत्यूमुळे एकूण संख्या चौदावर पोचली होती.
काल सोमवार दि. 13 रोजी सकाळी 6.45 वा. मांगोरहिल येथील मीरा शर्मा (47) हिला कोविड हॉस्पिटलात मृत्यू आला. तिला कॅन्सरचा आजार होता व तिच्यावर उपचार सुरू होते. त्यात तिला कोविडची बाधा झाल्याने तिला मृत्यू आला. त्यानंतर दुपारी 12.30च्या दरम्यान बेलाबाय-वास्को येथील लक्ष्मण गडेकर (60) याला कोविड हॉस्पिटलमध्ये मृत्यू आला. 8 जुलै रोजी त्याला ताप येऊ लागला व श्वास घेण्यास अडचण होऊ लागल्याने इस्पितळात दाखल केले होते. काल अतिदक्षता विभागात त्याने अखेरचा श्वास घेतला. वरुणापुरी-वास्को येथील रत्नाकर नवर (50) याला मृतावस्थेतच चिखली आरोग्य केंद्रात आणले होते. त्याला कोविडची लक्षणे असल्याने स्वॅब चाचणी घेतली असता कोविडमुळेच त्याला मृत्यू आल्याचे स्पष्ट झाले. गोव्यातील तो सतरावा बळी ठरला आहे.
कोविड मयतांना इतरही आजार होते : मुख्यमंत्री
कोरोनामुळे जे 17 रुग्ण बळी पडले त्यांना इतर गंभीर आजार होते. शिवाय ते 75 ते 85 वयोगटातील असल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. ते म्हणाले की, ज्यांचे बळी गेले त्यातील 4-5 जण कॅन्सरचे रुग्ण होते तर 8-10 जणांचे वय जास्त झाले होते. या गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे. त्यांना केवळ कोरोनाचाच आजार नव्हता तर इतर आजारांनी ते ग्रस्त होते, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.