एक बालक, दोन महिला व पाच पुरूषांचा समावेश : अन्य संबंधितांने विलगीकरण : बाराजण सोलापूरहून आले होते गोव्यात
प्रतिनिधी / मडगाव
एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींसह सातजण कोरोना संक्रमित रूग्णांना काल गुरूवारी पहाटे मडगावच्या कोविड-19 इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या रूग्णांवर उपचार सुरू झाल्याची माहिती डॉ. एडविन गोम्स यांनी दिली. या सात रूग्णांमध्ये एका लहान बालकाचा समावेश आहे. मात्र, या मुलाची आई निगेटिव्ह आहे. बुधवारी हे सातजण कोरोना संक्रमित आढळल्याने गोव्यात खळबळ माजली होती.
उत्तर गोव्यातील एक कुटूंब लॉकडाऊनच्यापूर्वी सोलापूरला गेले होते. हे कुटूंब लॉकडाऊनमुळे सोलापूरमध्येच अडकून पडले होते. बुधवारी ते पुन्हा गोव्यात आले असता पत्रादेवी चेकनाक्यावरील अधिकाऱयांना ते संशयास्पद आढळून आले. नंतर आझिलो इस्पितळात नेऊन त्यांची चाचणी घेण्यात आली असता, अहवाल सकारात्मक आढळून आला. त्यानंतर गोमेकॉत पुन्हा अंतिम चाचणी घेण्यात आली असता ते कोरोना संक्रमित असल्याचे शिक्कामोतर्ब झाले. गुरूवारी पहाटे 4. 45 वाजता त्यांना मडगावच्या कोविड-19 इस्पितळात आणले गेले.
गुजरातहून आलेला ड्रायव्हरही संक्रमित
वापी-गुजरात येथून भंगारमालाचा ट्रक घेऊन गोव्यात आलेल्या एका ड्रायव्हरला फोंडय़ात पोहोचला असता बेतोडय़ाच्या जवळपास महामार्गावर चक्कर आली. त्याला नंतर आयडी इस्पितळात नेऊन कोरोना चाचणी करण्यात आली असता, त्याचा अहवाल सकारात्मक आला. नंतर गेमेकॉत पुन्हा चाचणी घेतली असता तोही अहवाल सकारात्मक आला. या सातजणांना मडगावच्या कोविड-19 हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मुंबईहून आलेला गोमंतकीय खलाशी संक्रमित
गोमंतकीय खलाशी जो मुंबईत 14 दिवस विलगीकरणात होता, तो काल गुरुवारी गोव्यात आला असता, त्याची कोरोनासाठी प्राथमिक चाचणी घेतली असता तो संक्रमित असल्याचे आढळून आले. त्याची पुन्हा अंतिम चाचणी घेतल्यानंतर त्यालाही कोविड-19 इस्पितळात भरती केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात खुद्द आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.
डॉ. एडविन गोम्सनी पुन्हा घेतला ताबा
बुधवारी संध्याकाळी गोव्यात सात कोरोना संक्रमित रूग्ण आढळून आल्यानंतर तातडीने कोविड हॉस्पिटलच्या बहुतेक सर्व कर्मचाऱयांना काल बुधवारी सायंकाळी पुन्हा डय़ुटीवर रूजू होण्याचे आदेश दिल्याने या कर्मचाऱयांची बरीच धावपळ झाली. सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 60 कर्मचारी डय़ुटीवर रूजू झाले. नर्सेस, ईएसआयचे प्रमुख डॉ. विश्वजित फळदेसाई यांचाही समावेश होता. मध्यरात्री डॉ. एडविन गोम्स हे कोविड-19 हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांनीच सात रूग्णांना आणले जात असल्याची कल्पना सर्वांना दिली.
बुधवारी डॉ. गोम्स यांचा होता वाढदिवस
कोविड-19 हॉस्पिटलमध्ये यापूर्वी सात रूग्णांवर उपचार करून त्यांना ठिक केल्यानंतर येथील कर्मचाऱयांना विशेष असे काम नव्हते. मात्र सर्व कर्मचारी नेहमी प्रमाणे डय़ुटीवर येत होते. काल डय़ुटी संपवून अनेकजण आपल्या घरी पोचणार तोच, त्यांना पुन्हा डय़ुटीवर रूजू होण्याचा आदेश आला व त्यांची धावपळ सुरू झाली. डॉ. एडविन गोम्स यांचा बुधवारी वाढदिवस होता, त्यांनी तो आनंदात साजरा ही केला होता. मात्र, बुधवारी संध्याकाळी गोव्यात सात कोरोना संक्रमित रूग्ण आढळून आल्याने, त्यांनाही पुन्हा डय़ुटीवर रूजू होण्यासाठी सज्ज रहावे लागले.
रुग्णांमध्ये एका बालकाचाही समावेश
डॉ. एडविन गोम्स यांनी पुन्हा कोविड-19 हॉस्पिटलाचा ताबा घेतला व रूग्णांवर उपचार सुरू केले. यात एक वर्षाचे बालक असल्याने, त्यांची विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुरूवारी पहाटे जेव्हा हे रूग्ण कोविड-19 इस्पितळात पोचले, तेव्हा सर्वजण वाहनातून उतरल्यानतंर चालत वॉर्डमध्ये गेले. त्यामुळे सर्वाची प्रकृती चांगली असल्याचे स्पष्ट झाले. नंतर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले. सद्या या इस्पितळाच्या बाहेर पोलीस तैनात करण्यात आले असून कोविड-19चे कर्मचारी सोडून इतर कुणालाही प्रवेश दिला जात नाही.