फेसमास्क वापरा, सामाजिक अंतर पाळण्याचे निरीक्षक मोहन गावडे यांचे आवाहन
प्रतिनिधी / फोंडा
राज्यात कोरोना बाधितांचा आकडा उंच्चाक गाठत असतानाही फोंडा मार्केट परिसरात कोरोना मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्याचे सोयरसुतक नागरिक पाळत नसल्याची चित्र दिसत आहे. फेसमास्क संबंधी जागृती मोहीमेनंतर अवघ्या वीस दिवसात सुमारे 2067 जणांना तर एकूण 4022 जणांना फेसमास्क परिधान न केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आल्याची माहिती फोंडय़ाचे पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांनी दिली, तरीही परिस्थिती सुधारत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने पंचायत स्तरावर फेसमास्कसंबंधी दंड ठोठावण्याचे आदेश जारी करणे गरजेचे आहे. कोविडच्या दुसऱया लाटेत नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घेणे अंत्यत गरजेचे आहे. सद्यपरिस्थितीत कोरोनाबाधितांच आकडा दिसवाकाठी हजारपर्यंत पोचत आहे. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना मार्गदर्शक तत्वाचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.
फोंडय़ात 20 दिवसात 2067 विनामास्क तर एकूण 4022 जणांना दंड
फोंडा पोलीसांतर्फे कोरोना तीव्रता कमी झाल्यानंतर जानेवारी ते मार्च 2021 या काळात फेसमास्कसंबंधी शिथिलाता बाळगताना दंड ठोठावण्याचे प्रमाण कमी केले होते. परंतू कोरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढू लागल्याने 28 मार्चपासून सरकारने प्रत्येक पोलीस स्थानकाला कोरोनासंबंधी जागृतीचे फेरआदेश दिले. त्यानंतर अवघ्या वीस दिवसात 2067 जणांना दंड ठोठावण्यात आले तरीही नागरिक फेसमास्क परिधान करण्याचे आदेशाचे पालन काटेकोरपणे करीत नसल्याची खंत निरीक्षक गावडे यांनी व्यक्त केली आहे. राज्यात लॉकडाऊनच्या हालअपेष्टा प्रत्येक नागरिकांनी यापुर्वी अनुभवलेली आहे. कोरोनावर प्रतिबंधक लस फक्त 45 वर्षावरील नागरिकांसाठी उपलब्ध झालेली आहे, सुजाण नागरिक बनून सामाजिक अंतर पाळा, सार्वजनिक ठिकाणी फेसमास्क वापरा असे आवाहन फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांनी केले आहे.