निर्दोष वैज्ञानिकांवर चिखलफेक करत असल्याचा कांगावा
वृत्तसंस्था/ वुहान
कोरोना विषाणूच्या उत्पत्तिवरून जगभराच्या निशाण्यावर आलेला चीन आता बचावाच्या भूमिकेत शिरला आहे. कोरोनाच्या उत्पत्तिवरून सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या चीनमधील वुहान लॅबच्या वैज्ञानिकांनी जगाच्या आरोपांना आधारहीन ठरविले आहे.
चीनमध्ये ‘बॅट वुमन’ नावाने प्रसिद्ध वुहान इन्स्टीटय़ूट ऑफ वायरोलॉजीच्या उपसंचालिका शी झेंगली यांनी भूमिका मांडली आहे. जग निर्दोष वैज्ञानिकांवर कुठल्याही पुराव्यांशिवाय चिखलफेक करत आहे. वुहान लॅबमधून कोरोना विषाणू फैलावल्याचा दावा पोकळ असल्याचे झेंगली यांनी म्हटले आहे.
वुहान लॅबविषयी व्यक्त होणाऱया कयासांमध्ये तसूभरही सत्यता नसल्याचे झेंगली यांनी नमूद केले आहे. वुहान इन्स्टीटय़ूट ऑफ वायरोलॉजीमध्ये वटवाघळांवर निष्काळजीपणे संशोधन करण्याचा आरोप झेंगली यांच्यावर झाला होता. झेंगली यांच्या निष्काळजीपणामुळेच जगभरात कोरोना फैलावल्याचे अनेक तज्ञांचे मानणे आहे.
अमेरिकेचा गुप्तचर अहवाल
वुहान लॅबचे अनेक वैज्ञानिक ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये कोरोनाबाधित आढळले होते, असा दावा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या अहवालात करण्यात आला आहे. जर हे वैज्ञानिक प्रारंभीच कोरोना संक्रमित झालेले असल्यास विषाणूच्या उगमस्थानाचा शोध लावला जाऊ शकतो. पण अमेरिकेच्या अहवालानंतर चीनने तीव्र प्रतिक्रिया देत तो फेटाळून लावला होता.
वुहान लॅबमधून फैलाव
अमेरिकेच्या 18 वैज्ञानिकांच्या समुहाने अलिकडेच कोरोनाच्या उत्पत्तिची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. विषाणू वुहान लॅबमधूनच बाहेर पडल्याचे त्यांचे मानणे आहे. हे सर्व वैज्ञानिक सार्स परिवारातील विषाणूंवर अध्ययन करत आले आहेत. याचदरम्यान कोरोनाच्या उत्पत्तिचा शोध लावण्याचा आदेश अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी गुप्तचर यंत्रणांना दिला आहे. त्यांनी यासंबंधीचा अहवाल 90 दिवसांमध्ये मागविला आहे. वुहान लॅबप्रकरणीही चौकशी करण्याचा निर्देश बायडेन यांनी दिला आहे.