ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना उपचारांवर ‘टेइकोप्लानिन’ हे औषध इतर औषधांपेक्षा अधिक प्रभावी ठरत असल्याचा निष्कर्ष आयआयटी दिल्लीच्या संशोधनातून समोर आला आहे.
आयआयटीच्या कुसुमा स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेसच्या संशोधनात 23 मान्यताप्राप्त औषधांचा अभ्यास करण्यात आला. कोरोना विषाणूवर उपचार करण्याचे पर्याय दर्शवण्यात आले. त्यामध्ये ‘टेइकोप्लानिन’ हे सध्या वापरल्या जाणाऱ्या इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी ठरू शकते.
आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक अशोक पटेल म्हणाले, कोरोनावरील इतर महत्त्वाच्या औषधांच्या तुलनेत आमच्या प्रयोगशाळेत सर्स-सीओव्ही-2 विरुद्ध लोपिनावीर आणि हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सारख्या औषधांपेक्षा टेइकोप्लानिन 10 ते 20 पटीने अधिक प्रभावी असल्याचे आढळून आले.
पटेल यांना या संशोधनात ‘एम्स’चे डॉ. प्रदीप शर्मा यांनीही मदत केली. या संशोधनाचा अहवाल इंटरनॅशनल जर्नल ऑफ बायोलॉजिकल मॅक्रोरेणूजमध्येही प्रकाशित करण्यात आला आहे. टेइकोप्लानिन हे एफडीएने मंजूर केलेले ग्लायकोपेप्टाइड प्रतिजैविक आहे, जे पॉझिटिव्ह जिवाणूंच्या संसर्गांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते.