प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यात होणाऱ्या कोरोना मृतांवर सातारा नगरपालिका अत्यसंस्कार करत आहे. यामुळे नगरपालिकेकडून एका अत्यसंस्कारासाठी 15 हजार रूपये खर्च करण्यात येत असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कायम असला तरी गुरूवारच्या अहवालानुसार बाधित रूग्णांची संख्या 566 आहे. तर 367 नागरिक कोरोना मुक्त झाले आहे. तसेच 16 जणांचा कोरोनाने बळी गेलेला आहे. या मृतांवर सातारा नगरपालिका अत्यसंस्कार करते. गतवर्षीपासून कोरोनाने मृत्यू झालेल्यावर होणाऱ्या अत्यसंस्काराचा संपूर्ण खर्च सातारा नगरपालिका करत आहे. गतवर्षीच्या 27 मे 2020 ते चालु वर्षीच्या 15 जुलै 2021 पर्यंत 3 हजार 242 अत्यसंस्कार झाले आहेत. त्यांचा खर्च 1 कोटी 2 लाख 45 हजार 263 इतका झाला आहे.
सातारा शहरातच जिल्हा कोविड सेंटर आहे. या सेंटरमध्ये शहरातील रूग्णासह कराड, मेढा, म्हसवड व इतर तालुक्यातील रूग्ण उपचारासाठी दाखल होतात. या रूग्णांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्यावर सातारा नगरपालिकेचे कर्मचारी अत्यसंस्कार करत आहेत. परंतु जिल्ह्यातील इतर नगरपालिका फक्त त्यांच्या हद्दीतील मृतांवर अत्यसंस्कार करत आहे. हद्दीबाहेरील अत्यसंस्कारासाठी या नगरपालिका पैसे घेतात. मात्र, सातारा नगरपालिका सर्वच मृतांवर अत्यसंस्कार करत असल्याने पालिकेवर अत्यसंस्काराचा भार वाढला आहे.