देशातील कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका तसेच वैद्यकीय कर्मचारी देखील या महामारीच्या तडाख्यात सापडत आहेत. 4 डॉक्टर्स आणि दोन परिचारिकांच्या नंतर दिल्ली येथील सर गंगाराम रुग्णालयात प्रकार घडला आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने डॉक्टर्स तसेच परिचारिकांसह 108 वैद्यकीय कर्मचाऱयांना क्वारेंटाईन करण्यात आले आहे.
हे कर्मचारी कोरोनाबाधित 2 लोकांच्या संपर्कात आले होते. या रुग्णांचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 108 कर्मचाऱयांपैकी 85 जणांना घरांमध्ये तर 23 अन्य जणांना रुग्णालयात क्वारेंटाईन करण्यात आले आहे. या लोकांच्या प्रकृतीवर सातत्याने नजर ठेवली जात आहे. दोन्ही रुग्ण अन्य आजाराच्या उपचाराकरता रुग्णालयात आले होते. तेव्हा त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून येत नव्हती. परंतु रुग्णालयाने खबरदारीदाखल त्यांची चाचणी केली असता दोघेही पॉझिटिव्ह आढळून आले होते.