ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटपासून तयार झालेल्या नव्या व्हेरिएंटचा सायप्रसच्या संशोधकांनी शोध लावला आहे. सायप्रस विद्यापीठातील जीवशास्त्राचे प्राध्यापक लिओनिओस कोस्ट्रिक्स यांनी या व्हेरिएंटचे डेल्टाक्रॉन असे नामकरण केले आहे. कारण यात ओमिक्रॉन आणि डेल्टासारख्या जीनोमसारखी जनुकीय वैशिष्टय़े आहेत.
सायप्रसच्या संशोधकांच्या या टीमला डेल्टाक्रॉन व्हेरिएंटचे 25 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा हा प्रकार किती घातक आहे, त्याचा कसा परिणाम होईल, हे लगेच सांगणे घाईचे होईल, असे कोस्ट्रिक्स यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेने ओमिक्रॉन व्हेरिएंट कमी घातक असला तरी तो ज्या वेगाने लोकांना संक्रमित करत आहे. भविष्यात ओमिक्रॉन डेल्टावर भारी पडू शकतो. त्यामुळे जगाच्या चिंतेत भर पडली आहे.
दरम्यान, डेल्टाक्रॉनपेक्षा ओमिक्रॉन व्हेरिएंट जास्त संक्रमणकारक असल्याचे दिसून येत आहे. डेल्टाक्रॉनच्या आकडय़ांवर आमची नजर असून, डेल्टाक्रॉनवर संशोधन सुरू असल्याचे कोस्ट्रिक्स यांनी सांगितले.