कोरोना लसीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करा : उच्च न्यायालयाचे गोवा सरकारला निर्देश
प्रतिनिधी / पणजी
कोरोनाच्या तिसऱया लाटेचा धोका कायम असून ती येण्याची वाट पाहू नका, तोंड देण्याची तयारी करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने सरकारसह सर्वांना दिले असून गोमंतकीय जनतेला कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस तातडीने पुरवावेत, म्हणून केंद्र सरकारकडे राज्य सरकारने पाठपुरावा करण्याचा आदेश दिला आहे.
कोरोनाशी संबंधित विविध प्रकारच्या एकूण 6 जनहित याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने काल सोमवारी वरीलप्रमाणे शिफारस केली आहे. गोवा राज्य लहान असून कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर जास्त आहे. असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले असून केंद्राने पुरेशा प्रमाणात गोव्यासाठी लसींचा पुरवठा करावा, अशी मागणी गोवा सरकार करणार आहे की नाही? अशी विचारणा केली. तेव्हा गोव्याचे ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी त्याचा पाठपुरावा चालू असल्याची माहिती न्यायालयास दिली. गोमेकॉत कोरोना रुग्णांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन, फ्वोमीटर, ऍक्सिमीटर, औषधे पुरवण्यात येत असून त्या समस्या संपुष्टात आल्याचे पांगम यांनी न्यायालयास सांगितले. त्याबाबत सर्व ती दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी न्यायालयासमोर नमूद केली. कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र ज्यांना हवे असेल त्यांनी ते खासगी लॅबमधून तपासणी करुन घ्यावे, असेही पांगम यांनी न्यायालयास कळवले.