ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजविला आहे. या लाटेत सामान्य माणसांसह, अनेक सेलिब्रिटी, आमदार, खासदार, राजकीय नेते, मुख्यमंत्री आदींना कोरोनाने आपले शिकार बनवले आहे. एवढेच नाही तर कोरोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही या महमारीचा सामना करावा लागला आहे.
- मृतांमध्ये दिल्लीतील 100 डॉक्टरांंचा समावेश
याबाबत अधिक माहिती देताना, भारतीय मेडिकल असोसिएशनकडून (IMA) एक धक्कादायक आकडा जारी करण्यात आला आहे. IMA च्या मते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत तब्बल 420 डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये एकट्या दिल्लीतील 100 डॉक्टरांंचा समावेश आहे. तर बिहारमधील 96 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
मागच्या गुरुवारी IMA कडून सांगण्यात आले होते की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 329 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर मागील वर्षी कोरोना संकटात देशातील 736 डॉक्टरांना आपला जीव गमावावा लागला आहे.
IMA जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात दुसऱ्या लाटेत दिल्ली आणि बिहारनंतर उत्तर प्रदेशातील 41 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुजरात मधील 31, आंध्र प्रदेश 26, तेलंगणा 20, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये प्रत्येकी 16-16, महाराष्ट्रात 15, तामिळनाडू 14, मध्य प्रदेशातील 13 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.