आठवडी बाजाराला अल्प प्रतिसाद, व्यापारी चिंतेत
वार्ताहर/ माशेल
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेले कित्येक महिने बंद असलेला बाणस्तारीचा आठवडी बाजार सुरक्षा व्यवस्थेसह गुरूवार 17 सप्टे. रोजी भरविण्यात आला. मात्र ग्राहकांचा अल्प प्रतिसाद लाभला. आठवडी बाजार 17 पासून रोजीपासून रोज भरविण्यात येईल असे सरपंच सुनिल भोमकर यांनी माहिती दिली होती, परंतू येथे लाभत असलेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे पुढील आठवडी बाजाराचे चित्र न्याहाळल्यानंतर भोम अडकोण पंचायत मंडळाने फेरविचार करावा अशी मागणी येथील व्यापारी व ग्राहकांकडून जोर धरू लागली आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे दोन्ही दिवशी बाजारांच्या ठिकाणी ग्राहक फिरकलेच नाही. व्यापाऱयांनीही धास्ती घेतली असून मोजक्याच व्यापाऱयांनी व्यापार थाटला होता. पहिल्या दोन दिवस बाजार अल्प प्रतिसादात सुरू आहे. फळविक्रेते, भाजीविक्रेते, मासळी विक्रेते ग्राहकांची वाट बघून असून बाजार खरेदीसाठी ग्राहकच नसल्याने व्यापाऱयाचे चेहरे हिरमुसलेले दिसले. यावर प्रतिक्रिया देताना काही व्यापाऱयांनी कोरोना महामारीत व्यापारासह दुकान थाटणेही जोखीमीचे असून काही लोकांच्या कडवट प्रतिक्रियाही ऐकविल्या. एकंदरीत बाणस्तारी बाजाराला अल्प प्रतिसाद लाभल असल्याने व्यापारी चिंतेत भर पडली आहे.