सौदी अरेबियाकडून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित : सीमाही केली बंद
जग एकीकडे कोरोना लसीची प्रतीक्षा करत असताना महामारीचा धोका कमी होताना दिसून येत नाही. ब्रिटनमध्ये लसीकरण सुरू झाल्यावरही कोरोना विषाणूत म्युटेशन (नवे स्वरुप) दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर एक आठवडय़ांसाठी बंदी घालत स्वतःच्या सर्व सीमाही बंद केल्या आहेत.
युरोपीय देशांमधून सौदीत दाखल झालेल्या लोकांना दोन आठवडय़ांचे स्वयंविलागीकरणाचे पालन करावे लागणार आहे. तर मागील 3 महिन्यात युरोप किंवा नवा कोरोना स्ट्रेन आढळलेल्या क्षेत्रांमधून आलेल्या लोकांना चाचणी करावी लागणार आहे. याचदरम्यान तुर्कस्ताननेही ब्रिटन, डेन्मार्क, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड येथून येणाऱया विमानोड्डाणांवर बंदी घातली आहे.
ब्रिटनमध्ये कठोर निर्बंध
ब्रिटनच्या सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. लंडनमध्ये लोकांना घरातून बाहेर पडण्यासही मज्जाव केला जाऊ शकतो. 13 युरोपीय देश फ्रान्स, जर्मनी, इटली, स्वीत्झर्लंड, पोर्तुगाल, बेल्जियम, ऑस्ट्रिया, बुल्गारिया, डेन्मार्क, फिनलंड, रोमानिया, क्रोएशिया आणि नेदरलँडने ब्रिटनमधून येणाऱया विमानोड्डाणांवर बंदी घातली आहे. कॅनडानेही 72 तासांसाठी अशाप्रकारची बंदी घातली आहे.
नवा स्ट्रेन जीवघेणा नसावा
ब्रिटनमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन जीवघेणा वाटत नाही, परंतु तो वेगाने फैलावत असल्याचे उद्गार अमेरिकेचे नियोजित सर्जन जनरल डॉक्टर विवेक मूर्ती यांनी काढले आहेत. कोरोनाची लस या नव्या स्ट्रेनच्या विरोधात कमी प्रभावी असेल याचेही कुठलेच पुरावे नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
अधिक फैलावाची क्षमता
विषाणूत सातत्याने म्युटेशन होत असते, म्हणजेच याचे स्वरुप बदलत असते. म्युटेशन झाल्याने बहुतांश वेरिएंट आपोआपच नष्ट होतात. परंतु कधीकधी हे पूर्वीच्या तुलनेत अधिक मजबूत आणि धोकादायक ठरतात. ही प्रक्रिया अत्यंत जलद होत असल्याने वैज्ञानिकांना एक स्वरुप समजेस्तोवर दुसरे नवे स्वरुप समोर येते. कोरोना विषाणूचे ब्रिटनमध्ये आढळलेले नवे स्वरुप पूर्वीपेक्षा 70 टक्के अधिक धोकादायक असल्याचा वैज्ञानिकांचा अनुमान आहे.