प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी प्रमाणे यंदाही अत्यंत साधेपणाने व ठराविक नागरिकांच्या उपस्थितीत श्रीराम नवमी बुधवारी भक्तीभावाने साजरी करण्यात आली. सातारा शहरातील काळाराम मंदिर, गोराराम मंदिर, माथेराम मंदिर, भगावाराम मंदिर व श्रीराम ध्यान मंदिर येथे प्रतिवर्षी उत्साहात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा मात्र प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत साधेपणाणे हा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
काही वेळेकरीता ही मंदिरे खुली करून येथे श्रीरामची पुजा अर्चा करण्यात आली. पण भाविकांना दर्शनाकरीता बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे भाविकांनी घराबाहेर न पडता घरातुनच श्रीरामला नमस्कार कले. त्यामुळे मंदिर परिसरात ही शांततेचे वातावरण होते.
येथील काळाराम मंदिराला 355 वर्षे पूर्ण झाली असुन श्री रामदासस्वामी व गुजराती समाजाचे लिलाधर गंगाधर यांच्या हस्ते या मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. यंदाही परंपरेप्रमाणे 13 वे वंशज रविंद्र पुरूषोत्तम शहा व मोहन शहा यांच्या कुटुंबीयांतर्फे मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. प्रारंभी सकाळी 8 वाजता महाआरती करण्यात आली. त्यानंतर दुपारी सव्वा बाराच्या सुमारास काही ठराविक सुवासीनींच्या हस्ते जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी पाळणा गीत सादर केले. तसेच श्रीरामाची विधीवत पुजन वंशपरंपरागत विश्वस्तांच्या हस्ते साजरा करण्यात आले.