वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
पाकचा क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱयावर आहे. उभय संघांमध्ये टी-20 चे तीन सामने आणि त्यानंतर दोन कसोटी सामने खेळविले जाणार आहे. पाकचा संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्यानंतर या संघातील अनेक खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली होती. दरम्यान, सोमवारी कोरोना चाचणीच्या पाचव्या फेरीमध्ये पाक संघातील सर्व खेळाडू निगेटिव्ह ठरले आहेत. आता त्यांना सरावासाठी परवानगी मिळणार आहे.
पाक संघातील 8 खेळाडूंना न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्यानंतर कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. या संपूर्ण संघाला क्वारंटाईनमध्ये बारा दिवसांसाठी ठेवण्यात आले होते. क्वारंटाईन कालावधीतील सोमवारी शेवटच्या दिवशी पाक संघातील सर्व खेळाडूंची पाचव्यांदा कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये या संघातील सर्व खेळाडू निगेटिव्ह असल्याचे न्यूझीलंडच्या आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले. मंगळवारपासून पाक संघाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी न्यूझीलंडच्या आरोग्य खात्याकडून अधिकृत मान्यता दिली जाणार आहे. पाक आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना ऑकलंडमध्ये 18 डिसेंबरला होणार आहे. तीन सामन्यांची टी-20 मालिका संपल्यानंतर उभय संघातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून प्रारंभ होईल.