नगरविकास खात्याकडुन मार्गदर्शन शिबीर
प्रतिनिधी / बेळगाव
शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱयांवर सोपविण्यात आली आहे. पण कोरोना विषाणुचा प्रसार वाढत चालल्याने स्वच्छतेचे काम कोणत्या पद्धतीने करण्याची गरज आहे. याबाबतचे मार्गदर्शन नगरविकास खात्याच्या वतीने महापालिकेच्या कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचाऱयांना बुधवारी ऑनलाईनद्वारा मार्गदर्शन करण्यात आले.
शहराच्या स्वच्छतेसाठी 1300 स्वच्छता कामगार कार्यरत आहेत. मात्र यापैकी 1100 कर्मचारी हंगामी तत्वावर काम करीत आहेत. उर्वरीत 200 कर्मचारी महापालिकेत कायमस्वरूपी आहेत. सध्या 58 पैकी 48 वॉर्डमधील स्वच्छतेचे काम हंगामी तत्वावर करण्यात येते. उर्वरीत 10 वॉर्डमधील स्वच्छतेचे काम महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱयांकरवी करण्यात येते. त्यामुळे महापालिकेच्या कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचाऱयांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. बुधवारी दुपारी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱयांना शिबीरात भाग घेण्याची सूचना करण्यात आली होती.
नगरविकास खात्याच्या वतीने हे शिबिर आयोजित करून स्वच्छतेचे काम कसे हाताळावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सध्या कोरोना विषाणुचा प्रसार मोठय़ा प्रमाणात होत आहे. सर्वत्र कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. अशा स्थितीत स्वच्छतेचे काम कसे हाताळावे याचे प्रशिक्षण स्वच्छता कर्मचाऱयांना देण्यात आले. कोरोना विषाणुपासून बचाव करण्यासाठी स्वच्छतेचे काम करताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. तसेच हातमोजे घालणे व सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. एखाद्या घरामध्ये कोरोनाबाधित रूग्ण असल्यास सहा फूटाचे अंतर ठेवून कचरा घ्यावा. तसेच विशेष प्रकारच्या तयार करण्यात आलेल्या पिशव्यांमध्येच हा कचरा जमा करून पॅकबंद करावा, असे मार्गदर्शन कर्मचाऱयांना करण्यात आले. स्वच्छतेचे काम झाल्यानंतर हात स्वच्छ धुणे आवश्यक असून, कोणत्या पद्धतीने हात धुवावे याचे प्रात्यक्षिक कर्मचाऱयांना ऑनलाईनद्वारा दाखविण्यात आले. कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता कर्मचाऱयांच्या आरोग्याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने माहिती देण्यात आली. कर्मचाऱयांना ताप, सर्दी, खोकला अशा प्रकारची लक्षणे असल्यास तातडीने कोरोना चाचणी करून घेण्याची सूचना करण्यात आली. तसेच विविध सूचना कर्मचाऱयांना करण्यात आल्या. आरोग्याची दक्षता घेत शहराच्या स्वच्छतेचे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी या शिबिरात महापालिकेचे पर्यावरण सहाय्यक अभियंते आदिलखान पठाण, प्रविण किलारी, अभियंत्या महादेवी आदिंसह सुपरवायझर, स्वच्छता निरीक्षक, आणि स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले होते.