घरातच नामजपाने श्रीराम, हनुमान जंयती साजरी करण्याचे आवाहन
प्रतिनिधी / फोंडा
विश्व हिंदू परिषद गोवा प्रांतातर्फे गुढीपाडवा ते हनुमान जयंतीपर्यंत तेरा अक्षरी रामनाम जप हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. गोव्यातील हिंदू बांधवांनी किमान रोज एक माळ व शक्य असल्यास जास्तीत जास्त वेळा आपल्या घरातूनच हा जप करण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी तथा माजी आमदार मोहन आमशेकर यांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केले.
यावेळी विहिपचे गोवा प्रांत अध्यक्ष संतोष महानंदू नाईक व अभय भामईकर हे उपस्थित होते.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचा प्रभाव वाढल्याने रामनवमी उत्सवावर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक हिंदू बांधवांनी आपल्या घरीच श्रीरामनाम जप करावा. गोव्यासह कोकण प्रांतातील हिंदू बांधवांकडून होणाऱया या जपांची एकत्रित संख्या प्रांत व अयोध्यातील मुख्य केंद्रापर्यंत पोचवली जाणार आहे. समाजातील सात्विक भाव जागृत व्हावा, बंधूभाव निर्माण व्हावा, दुष्ट शक्तींचा विनाश व्हावा व संपूर्ण देश व जग कोरोना महामारीतून मुक्त व्हावे, या उद्देशाने ही जप धारणा करण्याचे प्रयोजन असल्याचे मोहन आमशेकर यांनी सांगितले.
हनुमान जयंती म्हणजे 27 एप्रिलपर्यंत हा उपक्रम चालणार असून 28 एप्रिल रोजी विविध तालुक्य़ातील प्रमुख श्रीरामनामाच्या जपाची एकत्रित नोंद करून ती प्रांत व केंद्रापर्यंत पोचविणार आहेत. फोंडा तालुक्यासाठी प्रितेश देसाई 9423314715, धारबांदोडा तालुक्यासाठी आदित्य कुट्टीकर 9923231057 यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय पेडणे तालुक्यात नारायण नाईक, बार्देश स्वप्नील कांबळी, सत्तरी तुळशीदास काणेकर, तिसवाडी अभय भामईकर, वास्को श्याम नाईक, सालसेत श्री. शेटये, सांगे सत्त्यवान नाईक, केपे उमेश वारीक, काणकोण शैला प्रभूदेसाई हे केंद्र प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. विहिपतर्फे मुलांसाठी संस्कार शिबिर, रुग्णोपयोगी केंद्र हे अन्य उपक्रम सुरु होणार असल्याची माहिती आमशेकर यांनी दिली.