ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजविला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. या पार्श्भूमीवर अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्यातच आता गुरुवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) देखील 27 जून रोजी होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही परीक्षा आता 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या संदर्भात यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन देखील टाकले आहे. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2021 आणि भारतीय वन सेवा परीक्षा 2021 साठी 24 मार्च पर्यंत अर्ज मागवण्यात आले होते.
दरम्यान, गेल्या वर्षी परीक्षा 31 मे ते 4 ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात आली होती. आतापर्यंत मुख्य लेखी परीक्षा संपली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुलाखती रोखण्यात आल्या होत्या.