मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा : गोवा घटक राज्यदिनानिमित्त विविध योजना जाहीर
प्रतिनिधी / पणजी
कोरोनाने मृत झालेल्या आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाला रु. 2 लाख आर्थिक मदत सरकारतर्फे देण्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. त्याशिवाय कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घोषित केलेल्या योजनांची कार्यवाही गोव्यात करणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. गोव्यात कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना दहावीनंतर लॅपटॉप मोफत देणार असल्याचे सांगून कमकुवत पंचायतींना रु. 50 हजार देण्याची घोषणाही डॉ. सावंत यांनी केली आहे. येत्या 3 जूनपासून 18 ते 45 वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
35 व्या गोवा राज्य दिनानिमित्त जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी अनेक योजना जाहीर केल्या. कोरोनामुळे जे मृत झाले त्यांना डॉ. सावंत यांनी श्रद्धांजली अर्पण करून दुःख प्रकट केले. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी पंचायती, पालिकांसह डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी अशा सर्वांनी योगदान दिले आणि अजूनही ते देत आहेत. त्याबाबत डॉ. सावंत यांनी भाषणातून ऋणनिर्देश केला.
मंत्री, आमदारांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन
गोवा घटक राज्य दिनानिमित्त विविध मंत्र्यांनी आपापल्या मतदारसंघात विविध प्रकारचे कार्यक्रम तसेच विकासकामांचा शुभारंभ यांचे आयोजन केल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. बहुतेक सर्व मंत्र्यांची नावे घेऊन त्यांनी राज्य दिनी नेमके काय आयोजन केले यांचा तपशील डॉ. सावंत यांनी नमूद केला. राज्यातील सर्व 12 तालुक्यात हे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आखण्यात आल्याचे ते म्हणाले.
आतार्पंतची सर्व सरकारे, स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण
गोवा मुक्ती 1961 पासून गोवा केंद्रशासित प्रदेश असेपर्यंत म्हणजे 1987 पर्यंत व त्यानंतर 1987 मध्ये घटक राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर आतापर्यंतचा इतिहास तसेच गोव्याची प्रगती मुख्यमंत्र्यांनी थोडक्यात नमूद केली. आतापर्यंतच्या सर्व सरकारांची त्यांनी प्रशंसा करून त्यांनी गोव्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिल्याचे डॉ. सावंत म्हणाले. गोवा मुक्तीसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकाना त्यांनी सलाम केला आणि त्यांच्या कार्याची आठवण नोंदवली.
मोदी सरकारचे गोवा सरकार-जनतेकडून अभिनंदन
गोवा राज्याची 35 वर्षे पूर्ण होत असताना मोदी सरकारची पेंद्रात 7 वर्षे पूर्ण झाली म्हणून डॉ. सावंत यांनी मोदी सरकारचे अभिनंदन करून त्यांना गोवा सरकार तसेच जनतेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
चक्रीवादळातील बळींच्या कुटुंबाला रु. 4 लाख मदत
नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात गोव्यात 3 बळी गेले. त्यांच्या कुटुंबांना तातडीची म्हणून राज्य सरकारने रु. 4 लाख दिले. त्याशिवाय वादळात घरांची, शेतीची हांनी झालेल्या 70 टक्के लोकांना सरकारने आर्थिक मदत पुरवल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला.
वीज खाते अधिकारी, कर्मचाऱयांचे अभिनंदन-आभार
चक्रीवादळामुळे सरकारी खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून वीजखात्याला मोठा फटका बसला तरी वीजखात्याने रात्रंदिवस काम करून खंडित वीजपुरवठा पुर्ववत केला. याबाबत डॉ. सावंत यांनी वीज खाते कर्मचारी अधिकारी यांचे आभार मानले.
3 जूनपासून 18 ते 45 वयोगटातील लोकांचे लसीकरण
येत्या 3 जूनपासून 18 ते 45 वयोगटातील लोकांचे लसीकरण होणार आहे. दोन वर्षाची मुले असलेल्या माता-पित्यांना तसेच गंभीर आजार असलेल्या युवक युवतीना लसीकरणात प्राधान्य देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पायलट, टॅक्सीचालक, दिव्यांग, खलाशी अशा सर्वांना लसीकरण करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे अनाथ बालकांना मुख्यमंत्री आधार योजना
कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना मुख्यमंत्री अनाथ आधार योजना लागू करण्यात येणार आहे. ‘बचपन’ ही योजना त्यांच्यासाठी आहेच. परंतु ती 18 वर्षापर्यंत होती आता त्याना 21 वर्षापर्यंत वरील योजनेतून आर्थिक मदत पुरवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी
दिली. विविध खात्याच्या विविध योजना चालूच रहाणार असून ‘स्वयंपूर्ण गोवा’ मोहीमही सुरू रहाणार असल्याचे ते म्हणाले. अजूनही अनेक ठिकाणी गोवा दमण-दिव या नावाच्या खुणा दिसतात. त्यातील दमण-दिव हे शब्द काढून टाकण्यात येतील आणि आता फक्त ‘गोवा’ हे एकच नाव त्या ठिकाणी रहील असे त्यांनी नमूद केले.
सर्वांच्या सहकार्याने गोवा कोरोनामुक्त करुया
गोवा कोरोनामुक्त करण्याचे ध्येय ठेवण्यात आले असून ते साकार होईल अशी ग्वाही डॉ. सावंत यांनी आपल्या भाषणातून दिली. सरकारी तसेच खासगी हॉस्पिटल्सनी व आरोग्य केंद्रानी तेथील डॉक्टर्स नर्स, आरोग्य कर्मचारी अशा सर्वांनी कोरोना व्यवस्थापनासाठी चांगले योगदान दिले म्हणून आज गोवा कोरोनातून सावरण्यास मदत झाली आहे. कोरोना संसर्ग व बळी कमी होत आहेत. आपत्कालीन यंत्रणा, कोविड व्यवस्थापन यांनी देखील त्यासाठी हातभार लावला आहे. आरोग्य सचिव, मंत्री तसेच विविध खात्यांचे सचिव, मुख्य सचिव अशा सर्वांचेच त्याकरीता योगदान मिळाले असून जनतेच्या सहकार्याने गोवा राज्य पुन्हा एकदा कोरोनामुक्त करू अशी आशा डॉ. सावंत यांनी वर्तवली आहे.