ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जगभरात कोरोनाचे वेगवेगळे स्ट्रेन निर्माण झाले आहे. त्याच्या नावांवरून सध्या गोंधळ निर्माण झाला असून, वादही होताना दिसत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना विषाणूच्या सर्व स्ट्रेनचे नामकरण केले आहे.
WHO च्या माहितीनुसार भारतात आढळणाऱ्या B.1.617.2 व्हेरियंटला आता ‘डेल्टा’ (Delta) व्हेरियंट संबोधले जाणार आहे. तर B.1.617.1 या व्हेरियंटचे ‘कप्पा’ (Kappa) असे नामकरण केले आहे.
भारतासह इतर देशात आढळणाऱ्या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटचेही WHO ने नामकरण केले आहे. यात ब्रिटनमध्ये 2020 मध्ये आढळलेल्या नव्या व्हेरियंटला ‘अल्फा’ असे म्हटले आहे तर दक्षिण आफ्रिकेत आढळणाऱ्या व्हेरियंटला ‘बीटा’ असे नाव दिले आहे.
यांसह अमेरिकेत आढळणाऱ्या व्हेरियंटलाही WHO ने ‘एपलिसन’ तर ब्राझीलमध्ये आढळून आलेल्या स्ट्रेनला ‘गामा’ असे नाव देण्यात आले आहे. यासोबतच फिलीपाईन्समध्ये जानेवारी महिन्यात आढळून आलेल्या कोरोना स्ट्रेनचे नाव ‘थीटा’ असे ठेवले आहे.