सेन्सेक्स 552 ने तर निफ्टी 159 अंकांनी घसरला
वृत्तसंस्था / मुंबई
कोविड19 च्या वाढत्या दुसऱया टप्प्यातील संसर्गामुळे जगभरात पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे सर्व देश चिंतेत पडले आहेत. याचाच प्रभाव देशासोबत जगातील शेअर बाजारांवर पडत आहे. यामध्ये चालू आठवडय़ातील पहिल्याच दिवशी सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 552 अंकांनी घसरला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही घसरला आहे.
पहिल्या दिवशीचा शेअर बाजारातील व्यवहार सुरु झाल्यानंतर तो मुळातच घसरणीसोबत झाला होता आणि याचेच संकेत म्हणून दिवसभरात सेन्सेक्स 857 पेक्षा अधिक अंकांनी घसरला आहे. प्रमुख कंपन्यांच्या व्यवहारानंतर दिवसअखेर सेन्सेक्स 552.09 अंकांनी घसरुन निर्देशांक 33,228.80 बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 159.20 अंकांनी घसरुन 9,813.70 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक सात टक्क्मयांनी घसरले आहेत. सोबत ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, टाटा स्टील, आयटीसी आणि एचडीएफसी बँक यांच्या समभागांची विक्री झाल्याचे दिसून आले. मात्र अन्य कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक, सन फार्मा आणि ओएनजीसी यांचे समभाग वधारत बंद झाले आहेत.
जगभरात कोविड19 या विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट येण्याच्या संकेतामुळे जागतिक शेअर बाजाराचा कल हा नकारात्मक राहिल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. तर चीन आणि अमेरिका या देशांमध्ये कोविडचे संकट पुन्हा नव्याने येत असल्याने आर्थिक सुधारणेची शक्मयता आणखीन धुसर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचाच काहीसा परिणाम देशातील शेअर बाजारावर होत असल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्याचे पहायला मिळाले. कोरोनाच्या प्रसारामुळे किमतीवर दबाव वाढतो आहे.