राज्याच्या सीमा बंद करण्याचा सरकारचा विचार
प्रतिनिधी/ पणजी
कोरोनाच्या संशयित रुग्णांमध्ये राज्यातील एक माजी मंत्री असून तो स्वतःला वेगळे ठेवायला नकार देत आहे. गोव्यातून बेंगलोरला गेलेल्या व कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णासोबत हा माजी मंत्री होता. या विमानामध्ये असलेल्या आणखी आठ रुग्णांचा शोध सुरू आहे. सहाजणांना संशयित म्हणून गोमेकॉच्या वेगळय़ा वॉर्डमध्ये दाखल केले आहे. सदर माजी मंत्र्याला जबरदस्तीने वेगळे ठेवावे लागेल, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाचा एक रुग्ण गोव्यात सापडल्याचे सोशल मीडियाद्वारे जाहीर केल्याने एकच गोंधळ उडाला. सोशल मीडियाद्वारे गोवाभर ही माहिती पसरली. मात्र नंतर राणे यांनीच सदर माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले.
पाच हवाई प्रवाशांचा शोध जारी
सदर माजी मंत्र्याला वेगळे ठेवण्याची गरज आहे. पण तो तयार नाही. आपण त्याचे नाव घेणार नाही मात्र त्याने स्वतःला वेगळे केले नाही तर त्यांना जबरदस्तीने वेगळे करावे लागेल. ज्या महिला रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्यासोबत 43 प्रवासी होते. पाच प्रवासी तिच्या जवळपास होते. त्यामुळे या सर्व प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. यापैकी आठ जणांचा शोध जारी आहे.
व्हायरोलॉजी लॅब स्थापन करण्याचा प्रयत्न
गोव्यात व्हायरोलॉजी लॅब स्थापन करायला दोन-तीन कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे. विमानतळ व रेल्वे स्थानकावर सुमारे दहा थर्मल स्कॅनरची आवश्यकता आहे. खासगी इस्पितळामध्येही साधनसुविधा निर्माण करण्यावर सरकार भर देत आहे. सेल्फ डिक्लरेशन अर्ज उपलब्ध करण्यात आले असून लोकांनी स्वतःहुन काळजी घ्यायला हवी. अनेक लोक असे प्रकार लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र तसे न करता स्वतःहून काळजी घेणे आवश्यक आहे. कर्नाटक, महाराष्ट्र राज्यांतून पर्यटक सहलीसाठी गोव्यात येतात. ही वेळ पिकनीकची नाही. शाळांना व आस्थापनांना सुट्टी असल्याने लोक गोव्यात येत आहेत.
देशी विमानांतून, रेल्वेतून, गाडीतून पर्यटक येतात
देशी विमानातून पुणे, मुंबई येथून प्रवासी येतात. तसेच रेल्वेतून व गाडीतून अन्य राज्यांतील प्रवासी येतात. गोव्यातील लोकांनीही काळजी घ्यायला हवी. जे दुबईहून येतात किंवा अन्य ठिकाणाहून येतात त्यांच्याबाबत माहिती द्यावी. रहिवासी सोसायटीमध्ये राहणाऱयांनी याची काळजी घ्यायला हवी. लोकांनी आपला जीव धोक्यात घालू नये. डॉक्टर्ससोबत चर्चा झाली आहे. कशाप्रकारे काळजी घ्यायची यावरही चर्चा झाली आहे. रजेवर जाणाऱयांना मज्जाव केला जाईल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.
परराज्यातील वाहनांना बंदी घालण्याचा विचार
गोव्यात येणाऱया प्रवासी वाहनांना बंदी घालण्याचा विचार चालविला आहे. येत्या चार, पाच दिवसांत त्यावर निर्णय घेतला जाईल. गोव्यात बेळगाव व अन्य शेजारील राज्यांतून जीवनावश्यक वस्तू येतात. त्या वाहतुकीबाबतही विचार करायला हवा. मात्र जे पर्यटक अन्य राज्यांतून येतात त्यांनी गोव्यात येऊ नये. असे आवाहन राणे यांनी केले. रेल्वेतून, खासगी वाहनांतून येणाऱया प्रवाशांबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. गोव्यात भाजीपाला शेजारील राज्यांतून येतो व गोवा त्यावर अवलंबून आहे, त्याबाबत विचार करुन निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितल.s
रुग्ण सापडल्याच्या बातमीने गोंधळ
नॉर्वे येथून गोव्यात आलेला व गोमेकॉत उपचार घेत असलेला रुग्ण कोरोनाबाधीत असल्याचे खुद्द आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सोशल मीडियावरून गोव्यात पहिला कोरोना रुग्ण सापडल्याचे जाहीर केले. मात्र ही बातमी सोशल मीडियावरून व्हायरल होताच सर्वत्र गोंधळ निर्माण झाला. नंतर अवघ्या काही मिनिटांतच ही बातमी चुकीची असल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.