आर्थुर डिसिल्वांच्या विरोधात गुन्हा नोंद : सर्व प्रभागात अटीतटीच्या लढती,राजकीय व्यक्तींकडून विजयाचे दावे
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव शहरात सध्या कोरोनाचे जबरदस्त सावट आहे. या सावटच्या खाली देखील मडगावात 64.27 टक्के मतदान झाले. मडगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा हे प्रभाग सात मधून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ते कोरोना पॉझिटीव्ह असताना देखील काल मतदान केंद्राच्या बाहेर फिरू लागल्याने, त्यांच्या विरोधात फातोर्डा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला. ही एक घटना सोडता सर्वत्र शांततेत मतदान झाले. मडगाव पालिकेच्या सर्व प्रभागात अटीतटीच्या लढती होत असून काही धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
व्हायब्रंट मडगाव पॅनलचे प्रमुख दामू नाईक यांनी मडगाव पालिकेवर भाजपचा झेंडा लागणार असल्याचा दावा केला असून पालिकेवर सत्तास्थापन करण्यासाठी व्हायब्रंट मडगाव सज्ज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोरोना महामारीचा काळ असताना देखील मतदार केवळ मडगावच्या प्रेमासाठी मतदान करण्यास बाहेर पडले. आपण, त्यांचे आभार मानतो, असे ते म्हणाले.
नागरी गठबंधन पॅनलचे नेते दिगंबर कामत व विजय सरदेसाई यांनी नागरी गठबंधन पुन्हा एकदा मडगाव पालिकेवर सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे. भाजप सरकार सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरले असून लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्याचा परिणाम या निवडणुकीतून दिसून येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काल, सकाळपासूनच बऱयाच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी 12 वाजेपर्यंत मडगाव नगरपालिकेसाठी जवळपास 30 टक्के मतदान झाले होते. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत सर्वच मतदान केंद्रावर अवघ्याच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. संध्याकाळी 3 ते 5 वाजेपर्यंत पुन्हा मतदारांची उपस्थिती दिसून आली. कुडतरी मतदारसंघातील प्रभाग 25 मध्ये मतदारांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावून मतदान केले.
मतदानाची टक्केवारी घटली
गेल्यावेळी पालिका निवडणुकीत जवळपास 70 टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे ही टक्केवारी बऱयाच प्रमाणात घटली. त्यामुळे घटलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मडगाव पालिकेच्या सर्वच प्रभागात अटीतटीच्या लढती होत आहे.
आर्थुर डिसिल्वांच्या विरोधात गुन्हा नोंद
मडगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा हे कोरोना पॉझिटिव्ह असताना देखील काल प्रभाग सातमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर वाहनातून फिरताना आढळून आले. त्यांच्या उपस्थितीला व्हायब्रंट मडगावच्या तसेच गोवा फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप घेतला व पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक कपिल नायक हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आर्थुर डिसिल्वा यांना तंबी दिली व मतदान केंद्रावरून जाण्यास भाग पडले. तोपर्यंत हा प्रकार उपजिल्हाधिकारी व निर्वाचन अधिकाऱयापर्यंत पोहचला व त्यांनी गंभीर दखल घेतली. फातोर्डा पोलिसांनी या प्रकरणी आर्थुर डिसिल्वा यांच्या विरोधात कारवाई करण्यासंदर्भात त्यांनी लेखीस्वरूपात कळविले. त्याप्रमाणे, नंतर फातोर्डा पोलिसांनी आर्थुर डिसिल्वांच्या विरोधात गुन्हा नेंद केला.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी केले मतदान
मडगाव व फातोडर्य़ातील काही मतदान केंद्रावर कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांनी पीपीई किटचा वापर करून मतदान केले. पीपीई किट घालून कोरोना पॉझिटिव्ह मतदार आल्याने, मतदान केंद्रावरील निर्वाचन अधिकारी व अन्य कर्मचाऱयांमध्ये काहींसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
बऱयाच मतदारांनी भीतीच्या छायेखालीच काल मतदान केले. मतदान केंद्रावर कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात होते, सर्व मतदारांनी मास्क तसेच सेनिटायझरचा वापर केला तरी हाताच्या बोटाला लावण्यात येणारी शाई तसेच मतदानाचा शिक्का यामुळे कोरोनाची बाधा तर होणार नाही ना, अशी भीती देखील व्यक्त करण्यात आली.