भाजप सरकार खोटारडे : बीना नाईक
प्रतिनिधी /पणजी
कोरोना संकटात होरपळून निघालेल्या लोकांना आता महागाईचे चटके सहन करावे लागत असून याला सर्वस्वी भाजप सरकार जबाबदार आहे, अशी जोरदार टीका गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक यांनी केली आहे. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या गगनाला भिडलेल्या किंमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रयत्न करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यावेळी मुक्तमाला फोंडवेकर, फर्नांडो कुलासो व सांड्रा फर्नांडीस यांची उपस्थिती होती. पेट्रोल डिझेलचे दर भरमसाठ वाढले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचे दर तर प्रत्येक महिन्यागणिक 25-25 रुपयांनी वाढत आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून गॅस सिलिंडरवरील अनुदानही बंद करण्यात आले आहे. या अनुदानापोटी वार्षिक सरासरी 4 हजार रुपये प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात जमा होत होते. त्यांच्या कुटुंबाच्या खर्चात हातभार लागत होता. अशावेळी सर्वसामान्य लोकांनी करावे तरी काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुक्तमाला फोंडवेकर यांनी बोलताना, एरव्ही आंदोलनात सदैव आघाडीवर असणाऱया भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी आता मुख्यमंत्र्यांकडे पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे दर कमी करण्याची मागणी करावी, अन्यथा भाजप सरकार खोटारडे आहे, असेच म्हणावे लागेल, असे त्या म्हणाल्या. निवडणुकीपूर्वी भाजप सरकारने महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.