मार्चअखेर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वसुली विभाग सज्ज
वार्ताहर / कराड
स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात देश पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या कराड नगरपालिकेने कोरोना काळातही चांगली कामगिरी केली आहे. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातील लोक आर्थिक अडचणीत असतानाही पालिकेच्या करवसुली विभागाने आत्तापर्यंत कुठलीही सक्ती न करता तब्बल 46 टक्के वसुली केली आहे. तर मार्चअखेर सरासरी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. 100 टक्के उद्दिष्टासाठी मात्र कारवाईचा बडगा उगारावा लागणार आहे. त्यामुळे कारवाईची कटुता टाळण्यासाठी नागरिकांनी कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
कराड नगरपालिकेकडे एकुण 19 हजार 41 मिळकती नोंद आहेत. त्यांच्याकडून थकीत व चालू आर्थिक वर्षाची मिळून 18 कोटी रूपयांची कर मागणी आहे. तर आतापर्यंत 8 कोटी 42 लाख रूपयांची करवसुली करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर पालिकेची वसुली मोहीम थांबली होती. मात्र आक्टोबर, नोहेंबर महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर करवसुली विभागातील अधिकारी व कर्मचाऱयांनी आपापल्या वॉर्डमध्ये नियमित वसुली मोहीम सुरू केली. सध्य स्थितीतही करवसुली विभागाचे अधिकारी व कर्मचारी कुठलीही सक्ती न करता घरोघरी जाऊन कर भरण्याचे आवाहन करीत आहेत,
पालिकेच्या या आवाहनाला नागरिकांतूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट असले तरीही दरवर्षीच्या सरासरी प्रमाणेच यावर्षी करवसुली होईल, अशी अपेक्षा आहे. मार्च तोंडावर आल्याने वसुली विभाग अधिक सक्रीय झाला आहे. येत्या चार ते पाच दिवसांत थकबाकीदारांना नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.