प्रतिनिधी / फोंडा
देश सद्या कोविड काळातून उभारी घेत असतानाही सैन्यदलात भरती होण्यासाठी देशभरातून हजारो तरूणांनी दांडगा उत्साह दिसून येत आहे. फोंडय़ात मागील दोन दिवसापासून सैन्यदलात भरतीसाठी हजारो तरूण दाखल झाले आहेत. फोंडा येथील मिलीटरी ट्रेनिंग सेंटरात हा भरती कार्यक्रम होणार आहे.
कुर्टी फोंडा येथील क्रिडा प्रकल्पाच्या मैदानावर भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरूणांची सोय केलेली आहे. त्य़ाच्याबरोबर आलेल्या नातेवाईक व प्रेन्डर्स सर्कलला मात्र रस्त्याच्या फुटपाथवर, देऊळ परिसर, क्रांती मैदानावर झोपण्याची वेळ यंदाही कायम आहे. सैन्य भरती कार्यक्रमाचा सांगता 7 फेब्रु. रोजी होणार आहे. पहिल्या टप्प्यात टेक्निकल पदासाठी नातेवाईकांच्या कोटय़ातून त्यानंतर खेळाडूसाठी राखीव असलेल्य़ा पदासाठी ही भरती होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दर दोन वर्षानी ही भरती होत असते, यंदा कोरोनामुळे दक्षता घेणे बंधनकारकर असल्याने साधनसुविधा पुरविण्यासाठी राज्य सरकारने पुर्वनियोजित कार्यक्रम आखणे जरूरीचे होते.
फोंडा क्रीडा प्रकल्पाच्या गेटसमोर तरूणांची झुंबड उडालेली असून कुर्टी अंडरपास येथे जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. मागील काही वर्षापासून भरतीसाठी येणारे तरूण सकाळी उठल्यानंतर उघडयावर नैसर्गिक विधी करतात यावर देऊळ समितीने व इतर सामाजिक संस्थांनी आवाज उठविला होता. यंदा भरतीत सहभागी होणाऱया तरूणांसाठी मंडप व बायो डायजेस्टर टॉयलेटची सुविधा उपलब्ध केलेल्य़ा आहे. तरीही मैदानाबाहेर प्रतिक्षेत असलेल्या तरूणांसाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नव्हत्या. कुर्टी येथील क्रीडा प्रकल्पाच्या गेटसमोर अंधार असून नेमक्या याच स्थळावरील अंडरपासच्या एलईडी पेटत नसल्याने काळोख पसरलेला आहे. वाहतूकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांचीही व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.