1961 नंतरचा सर्वाधिक पाऊस : अनेक शहरे जलमय, प्रचंड नुकसान
वृत्तसंस्था/ बीजिंग
जगभरात कोरोना संसर्ग फैलावल्यावर चीन आता महापुराने घायकुतीला आला आहे. चालू वर्षात चीनमध्ये मागील 6 दशकांमधील सर्वाधिक पाऊस पडला आहे. अतिवृष्टीमुळे चीनमधील अनेक शहरे जलमय झाली असून रस्त्यांवर आता नौकांमधून प्रवास करण्याची वेळ आली आहे. लाखो वाहने पाण्यात बुडाल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. वुहान, हुबेई येथे सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. महापुरामुळे चीनला आतापर्यंत 8 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
यंदा जून महिन्यापासूनच चीनमध्ये प्रचंड पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे चीनची सर्वात मोठी नदी यांग्त्सेमध्ये पूर आला आहे. 1961 नंतरच्या कालावधीतील पावसाचा हा विक्रम ठरला आहे. अतिवृष्टीमुळे चीनमध्ये 140 जणांना जीव गमवावा लागला असून अनेक जण बेपत्ता झाले आहेत.
कोरोना महामारीमुळे चीनची अर्थव्यवस्था आधीच दोलायमान झालेली असताना महापुराच्या तडाख्यातून बाहेर पडण्याचे आव्हान त्याच्यासमोर उभे ठाकले आहे. 6 दशकांमधील या सर्वात मोठय़ा पुरामुळे चीनच्या काही प्रमुख शहरांची स्थिती बिकट झाली आहे. नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत.
वुहान शहरामध्ये पूर
यांग्त्से नदी हुबेई प्रांतातून वाहते आणि वुहान याची राजधानी आहे. वुहान शहरातूनच कोरोना महामारीचा जगभरात फैलाव झालेला आहे. पुराचा सर्वाधिक फटका हुबेई प्रांताला बसला आहे. भीषण पावसानंतर चीनमध्ये 33 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर किमान आठवडाभर अतिवृष्टी सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने संकट अधिक वाढण्याचे संकेत आहेत.