तब्बल 2110 नवे बाधित : 748 जण कोरोनामुक्त
प्रतिनिधी / पणजी
गेल्या काही दिवसांपासून गोव्यात कोरोनामुळे सरासरी एका तासाला एक किंवा त्यापेक्षा जास्त बळी पडत असून गेल्या 24 तासात म्हणजे मंगळवारी 31 जणांचा प्राण गेला आहे. गोव्यासारख्या लहान राज्यात मृत्यूदाराचे हे प्रमाण भयानक असून अजूनही त्याचे सोयरसुतक सरकारला नसल्याचे दिसून येत आहे. आता तरी लॉकडाऊन करा, अशी मागणी जनतेतून होत असून त्याकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. कोरोना संसर्ग कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे आता लॉकडाऊन हा एकच आणि शेवटचा पर्याय उरल्याचे चित्र समोर येत आहे. गोमेकॉत 23 जणांनी प्राण सोडला तर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात 5 जणांचा, इएसआय हॉस्पिटलात 1, तर खासगी हॉस्पिटलात दोन जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा वाढून 1086 वर पोहोचला आहे.
खाटा कमी, रुग्ण अधिक
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे कोरोनासंदर्भात फक्त आश्वासने देऊन घोषणाबाजी करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी असून कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. बेड कमी, रुग्ण जास्त अशी सध्या गोव्यातील कोरोनाची अवस्था असून सरकारी इस्पितळात दाखल होण्यासाठी येणाऱया रुग्णाला बेड मिळेल याची खात्री नाही. खासगी इस्पितळांचे दर तर अति महागडे असून तेथे सर्व सामान्य गरीब माणूस जाण्याचा विचारच करू शकत नाही, असे एकंदरीत चित्र आहे.
गोमेकॉत 210, होम आयोसोलेशनमध्ये 1414 रुग्ण
गेल्या 24 तासात 2110 नवे कोरोनाबाधित सापडले असून 748 जण बरे झाले आहेत. तर संशयित रुग्ण म्हणून 210 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले आहे. सुमारे 1414 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. सक्रिय कोरोना रुग्णांनी 16000 चा टप्पा ओलांडला असून त्याची संख्या 16591 झाली आहे. आतापर्यंत मिळून एकूण कोरोना रुग्णांची संख्या 80000 पार झाली असून 81908 वर पोहोचली आहे. त्यातील 64231 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
नियम मोडणाऱयांवर सक्त करवाई करा : मुख्यमंत्री
zzदरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार व इतर महसूल अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत चर्चा केली आणि कोरोनाचे नियम मोडणाऱयांच्या विरोधात सक्त कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विवाह सोहळे, इतर मेळावे, वाढदिवस अशा विविध कार्यक्रमास भेटी देऊन तेथे जास्त गर्दी असल्यास ठोस कारवाई करावी. तसेच जनतेमध्ये जाऊन जागृती करावी असेही त्यांनी चर्चेच्या वेळी बजावले आहे. आपापल्या तालुका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व ते उपाय करावेत व कन्टेनमेंट झोन करावेत, असेही डॉ. सावंत यांनी त्यांना सूचवले आहे.
कोव्हिशिल्डची मागणी ‘सीरम’ने फेटाळली गोवा राज्याची 5 लाख डोस कोरोना प्रतिबंधक लस (कोव्हिशिल्ड) पुरविण्याची मागणी सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने फेटाळल्यामुळे 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांना 1 मे पासून लस मिळण्याची शक्यता दुरावली आहे. त्यांना लसीकरीता प्रतिक्षा करावी लागणार असल्याची माहिती आरोग्य खात्याचे संचालक जोस डिसा यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, 45 वर्षांवरील लोकांना लस देण्याचे काम चालूच राहणार असून त्यात कोणताही खंड पडणार नाही. त्या लसींचा साठा पुरेसा असून तो केंद्र सरकारने उपलब्ध केल्याचेही ते म्हणाले.
लॉकडाऊन आवश्यक : मायकल लोबो
कळंगूटचे आमदार व कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी गोव्यात अशंतः लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे. राज्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे. अन्यथा हा संसर्ग वाढत रहाण्याचा धोका त्यांनी वर्तविला. कळंगूट, कांदोळी, नागोवा, हडफडे हे विभाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करावेत, अशी सूचना त्यांनी केली आहे. तेथे शेकडोंनी कोरोना रुग्ण सापडले असून ते वाढत आहेत, असेही त्यांनी निदर्शनास आणले आहे. सरकारने याचा विचार करावा, असेही त्यांनी नमूद केले.
हॉस्पिटल कर्मचाऱयांना आदेश
बांबोळी येथील गोवा मक्कडिकल कॉलेज व हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी, अधिकारी, कामगार, नर्स, डॉक्टर्स अशा सर्वांना शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी कामावर हजर रहाण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा सामना करण्यासाठी व त्यास रोखण्यासाठी सर्वांनी कामावर यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचा भंग केल्यास त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याचा इशारा आदेशातून देण्यात आला आहे.