98 टक्क्यांनी कमी झाले रुग्ण :
कोरोना महामारीमुळे जगभरात आतापर्यंत लाखो लोक दगावले आहेत आणि कोटय़वधी लोकांना याची लागण झाली आहे. कोरोना महामारीच्या खात्म्यासाठी आता जगभरात लस निर्मितीवर अत्यंत वेगाने काम सुरू आहे. कोरोना महासंकटादरम्यान आता जगातून फ्ल्यूचा आजार एकप्रकारे बेपत्ता झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या डाटातून याची पुष्टीही मिळाली आहे.
ऑस्ट्रेलियात एप्रिल महिन्यात फ्ल्यूचे केवळ 14 रुग्ण सापडले आहेत. तर 2019 मध्ये याच कालावधीत फ्ल्यूचे 367 रुग्ण आढळले होते. अशाप्रकारच्या फ्ल्यूच्या प्रकरणांमध्ये 96 टक्क्यांची घट झाली आहे. जून महिन्यात फ्ल्यूचे प्रमाण टोकाला पोहोचलेले असते, परंतु याचे एकही प्रकरण आढळलेले नाही. ऑस्ट्रेलियात फ्ल्यूचा जुलैपासून एकही रुग्ण जागतिक आरोग्य संघटनेच्या निदर्शनास आलेला नाही.
याचदरम्यान दक्षिण अमेरिकन देश चिलीमध्ये एप्रिलपासून ऑक्टोबरदरम्यान केवळ 12 रुग्ण सापडले आहेत. तर 2019 मध्ये चिलीमध्ये फ्ल्यूच्या संक्रमणाचे 7 हजार बाधित सापडले होते. दक्षिण आफ्रिकेत फ्लूच्या मौसममध्ये केवळ 2 रुग्ण आढळले आहेत. देशात चालू वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये 99 टक्क्यांपर्यंतची घट झाली आहे.
98 टक्क्यांची घट
ब्रिटनमध्ये फ्ल्यूचा मौसम आता सुरू झाला आहे, परंतु कोरोना विषाणू मार्चमध्ये फैलावण्यास प्रारंभ झाल्यापासून केवळ 767 रुग्णच सापडले आहेत. तर मागील वर्षी मार्चपासून ऑक्टोबरपर्यंत फ्ल्यूच्या संक्रमणाचे 7 हजार रुग्ण आढळले होते. मागील वर्षी ब्रिटनमध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान फ्ल्यूच्या प्रकरणांमध्ये 10 टक्क्यांची वृद्धी झाली होती. यंदा हे प्रमाण केवळ 0.7 टक्के राहिले आहे.