नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात 24 तासात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. मागील 24 तासांमध्ये देशात नव्या 62 हजार 714 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. नववर्षात आतापर्यंत 24 तासांच्या कालावधीत आढळलेले हे सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. मागील वर्षात 16 ऑक्टोबर 2020 रोजी 62 हजार 714 कोरोना रुग्ण आढळले होते, त्या उच्चांकाची बरोबरी रविवारी नोंद झाली. गेल्या पंधरवडय़ापासून देशात सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत ठराविक प्रमाणात मोठी वाढ दिसत आहे. तसेच आता मृत्यूंच्या आकडय़ातही वाढ होत असून शनिवारी एका दिवसात 312 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. बऱयाच दिवसांनंतर मृतांच्या आकडय़ाने 300 चा टप्पा पार केल्याचे चिंतेचे ढग वाढले आहेत. देशात आतापर्यंत एकंदर 1 कोटी 19 लाख 71 हजार 624 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र 1 कोटी 13 लाख 23 हजार 762 जणांनी कोरोनावर मात केल्याने मृतांचा आकडा इतर देशांच्या तुलनेत नियंत्रणात राहिला आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 61 हजार 552 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तरीही दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने आता सक्रिय रुग्णसंख्या वाढून 4 लाख 86 हजार 310 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेश येथे मोठय़ा संख्येने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी 3 लाख 3 हजार 475 म्हणजेच तब्बल 62.20 टक्के कोरोना सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 26 लाख 73 हजार 461 नागरिक कोरोनाबाधित झाले. यापैकी 23 लाख 14 हजार 579 जण कोरोनामुक्त झाले.