डेन्मार्कमध्ये संकट : विकसित होणाऱया लसीच्या उपयुक्ततेवर प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त
डेन्मार्कमध्ये सार्स-कोव-2च्या वेगळय़ा स्वरुपाच्या कोरोना संक्रमणाशी संबंधित 214 प्रकरणे सापडली आहेत. ही प्रकरणे मिंकशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. 5 नोव्हेंबर रोजी यातील 12 प्रकरणांमध्ये एका विशेष प्रकारचा कोरोना स्ट्रेन आढळून आला आहे. या खुलाशानंतर जगात नव्या धोक्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोना विषाणूंमधील झालेल्या बदलानंतर डेन्मार्कचे सरकार 1 कोटी 70 लाख मिंक मारण्याची योजना आखत आहे.
मिंक नव्या सार्स-कोव-2 विषाणूसाठी भांडारगृह ठरत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱयांचे म्हणणे आहे. डेन्मार्कमध्ये कोरोना विषाणूची परिवर्तित म्हणजेच विशेष प्रकारच्या या स्ट्रेनचे कित्येकांना संक्रमण झाले आहे. कोपेनहेगन येथली युरोपीय कार्यालयामध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन अधिकारी कॅथरीन स्मॉलवुड यांनी ही निश्चितपणे जगासाठी मोठी जोखीम असल्याचे उद्गार काढले आहेत.
मिंकची संख्या माणसांमध्ये कोरोनाचा हा नव्या प्रकारचा विषाणू फैलावण्यास कारणीभूत ठरू शकते. हा विषाणू माणसांमध्ये फैलावू लागल्यावर कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जगभरात विकसित केल्या जाणाऱया लसी या परिवर्तित विषाणूवरही प्रभावी ठरतील का हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या लसी निष्प्रभावी ठरल्यास मोठे नुकसान घडू शकते.
डेन्मार्कमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन लसींच्या प्रभावीपणाला निष्प्रभ करतील हे म्हणणे घाईचे ठरणार आहे. विषाणूतील या बदलाचा दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. घाईगडबडीत कुठल्याही निष्कर्षावर पोहोचू नये, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.
कोरोना विषाणू म्हणजेच सार्स-कोव-2मध्ये झालेले हे विशेष उत्परिवर्तन लसीच्या प्रभावीपणाला धक्का पोहोचविणार की नाही याविषयी सद्यकाळात कुठलाच पुरावा नाही असे स्वामीनाथन म्हणाल्या. आताच काही म्हणण्यापूर्वी कोरोनात झालेल्या या बदलाचे अध्ययन करण्याची गरज असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमात कार्यरत वैज्ञानिक मारिया वान केरखोव यांनी म्हटले आहे.
कोरोनात झालेले हे उत्परिवर्तन आतापर्यंतच्या विषाणूपेक्षा वेगळय़ाप्रकारे वर्तन करत असल्याचेही कुठलेच पुरावे सापडलेले नाहीत. यात बदल झालेला असला तरीही तो एक विषाणूच आहे. या विषाणूच्या फैलावात काही फरक आहे का, याचे मूल्यांकन करावे लागणार आहे. तसेच या बदलामुळे याच्या संक्रमणाच्या उपचारावर कुठला प्रभाव पडणार का याचाही विचार करावा लागेल. सध्या कुठल्याही निर्णयाप्रत पोहोचण्यापूर्वी एक दीर्घ मार्ग निश्चित करावा लागणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक मायकल रेयान यांनी म्हटले आहे.
ब्रिटन : नवा निर्बंध
डेन्मार्कमध्ये कोरोना संक्रमण वाढल्याने ब्रिटनने नव्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत. ब्रिटिश नागरिक डेन्मार्कमधून परत येऊ शकतात, परंतु त्यांना आणि त्यांच्या घरातील सदस्यांना 14 दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे. केबिन क्रूलाही आता नियमांमधून सूट देण्यात आलेली नाही. 5 नोव्हेंबर रोजी इंग्लंडमध्ये दुसरी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. डेन्मार्कमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे युरोपीय देशांना धडकी भरली आहे. नव्या स्ट्रेनमधून संक्रमणाचा फैलाव वेगाने झाल्यास आधीच संकटात सापडलेले युरोपीय देश अधिकच अडचणीत येणार आहेत.